जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:06 AM2022-11-15T11:06:33+5:302022-11-15T11:26:55+5:30

१२ वर्षांपूर्वी राहुल गांधी पोहोचले होते थेट कलावतीच्या घरी

Jalka's Kalavati to visit Rahul Gandhi in Washim after 12 years on the occasion of 'Bharat Jodo' Yatra | जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

Next

देवेंद्र पोल्हे

मारेगाव (यवतमाळ) : सन २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आले असता, त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कलावती बांदूरकर यांच्या चंद्रमौळी झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. आता भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कलावतीला त्यांच्या भेटीची आस लागली असून, मंगळवारी त्या वाशिम येथे १२ वर्षांनंतर राहुल गांधींंना भेटणार आहेत.

१२ वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील जळका येथे राहुल गांधी यांनी अचानक जाऊन कलावती बांदूरकर यांची भेट घेऊन सांत्वन केले होते तसेच त्यांच्या घरी चहाही घेतला होता. दिल्ली येथे परत गेल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेच्या सभागृहात कलावतीची व्यथाही मांडली होती. त्यामुळे कलावती बांदूरकर देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या. या घटनेमुळे त्यांना मोठी आर्थिक मदत मिळून त्यांचे जीवन बदलून गेले होते.

कलावती यांचे पती परशुराम बांदूरकर यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सन २००५ मध्ये शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या मागे पत्नी कलावती, सात मुली व दोन मुले असा आप्तपरिवार होता. अशातच सन २००८ मध्ये राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी अचानक भेट दिली. या भेटीनंतर कलावतीची एकूण परिस्थिती लक्षात सुलभ इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचे डॉ. बिनदेश्वर पाठक यांनी कलावतीच्या घरी येऊन तिला ३६ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यामुळे कलावतीचे जीवन बदलून गेले होते. आता राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने ज्यांच्यामुळे आपल्याला जगण्याचा नवा मार्ग मिळाला, त्या राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा वृद्धापकाळाने थकलेल्या कलावतीने व्यक्त केली होती.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश धानोरकर यांनी कलावतीच्या भावना लक्षात घेऊन राहुल गांधी यांच्यासोबत कलावतींची भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर कलावतीला घेऊन सोमवारी दुपारी वाशिमकडे रवाना झाल्या. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता वाशिम येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या कॉर्नर सभेत ही भेट घडवून आणली जाणार आहे.

राहुल गांधी पंतप्रधान व्हावे

आता देशाला राहुल गांधींसारख्या नेत्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या देशात सर्वधर्मीय आनंदाने या देशात नांदू शकतील म्हणून राहुल गांधी एकदा देशाचे पंतप्रधान बनावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

संकटांची मालिका तरीही कलावतीचा लढा

राहुल गांधींच्या भेटीने आर्थिक स्थैर्य लाभलेल्या कलावती बांदूरकर यांच्यावर मात्र संकटांची मालिका सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक बी.ई. असलेला मुलगा अपघातात मृत्युमुखी पडला, तर वेगवेगळ्या कारणांनी दोन मुलींचाही मृत्यू झाला. मात्र तरीही त्या मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

Web Title: Jalka's Kalavati to visit Rahul Gandhi in Washim after 12 years on the occasion of 'Bharat Jodo' Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.