यवतमाळ : तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे सजविलेल्या रथातून बुधवारी यवतमाळात आगमन झाले. येथील समता मैदानावर ठेवलेल्या या पवित्र अस्थीचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांनी रीघ लावली होती. भारतीय बौद्ध महासभा आणि रिपाइंच्या पुढाकारात हा पवित्र अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. श्रीलंकेतील नीलगिरी सह्य स्तुपात या पवित्र अस्थी सापडल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने या अस्थीचे भारतात आगमन झाले आहे. श्रीलंकेतून निघालेला हा अस्थीकलश बुधवारी सायंकाळी यवतमाळ शहरात दाखल झाला. येथील समता मैदानावर हा अस्थीकलश आला तेव्हा हजारो नागरिकांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. यावेळी समता मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी होत्या. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुधाकर तायडे, जिल्हाध्यक्ष मोहन भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भिख्खू समूहाची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन अस्थी कलशाचे दर्शन घेतले.
गौतम बुद्धांच्या अस्थिदर्शनासाठी जनसागर
By admin | Published: October 15, 2015 2:54 AM