यवतमाळ : दिल्ली येथे झालेल्या ४४ व्या आंतरराष्ट्रीय टेक्सटाईल संशोधन परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवित आपले शोधनिबंध सादर केले. टेक्सटाईल मशिनरी सोसायटी आॅफ जापान आणि इंडियन इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. ‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल विभागाचे प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी ‘इफेक्ट आॅफ केमिकल प्रोसेसिंग ट्रिटमेंट आॅन लो स्ट्रेस मेकॅनिकल प्रॉपर्टीज आॅफ वेस्टेड सुटिंग फॅब्रिक्स’ या विषयावर, तर टेक्सटाईल विभागाचे प्रा. संदीप सोनी यांनी ‘हँड प्रॉपर्टीज आॅफ डेनिम फॅब्रिक्स’ आणि रसायन विभागाचे प्रा. सचिन अस्वार यांनी ‘सेप्रेशन आॅफ मॉडेल अॅनिओनिक डाय आॅन हायब्रिड सीएस-सीएफ मेंबरेन्स : बायो पॉलिमर्स फॉर इन्व्हायरमेंटल रेमेडिएशन’ या विषयावर आपले शोधनिबंध सादर केले. टेक्सटाईल मशिनरी सोसायटी आॅफ जापानतर्फे १९७२ पासून ही परिषद भरविली जात आहे. यात टेक्सटाईल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व तत्सम संशोधनासंबंधी अद्यावत माहिती जागतिकस्तरावर विषद केली जाते. विविध देशातील टेक्सटाईल संशोधक, प्राध्यापक, तंत्रज्ज्ञ आदी यामध्ये सहभाग घेत संशोधनावर आधारित शोधनिबंध सादर करतात. यावर्षीच्या परिषदेत भारतासह जापान, अमेरिका, इंग्लंड, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग, हंगेरी, झेप रापब्लिक, थायलंड, पोलंड आदी देशातील टेक्सटाईलसंबंधी मंडळींचा सहभाग होता. ४५ वी आंतरराष्ट्रीय टेक्सटाईल संशोधन परिषद जापान येथील क्योटो या शहरात १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ४४ व्या संशोधन परिषदेत सहभागी झालेल्या प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी स्वागत केले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’च्या प्राध्यापकांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
By admin | Published: February 21, 2017 1:25 AM