यवतमाळ : महागाव तालुक्यातील घोन्सरा येथे घराबाहेर झोपलेल्या वृद्ध महिलेचा दोघांनी गळा चिरुन चांदीचे दागिने लुटले. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री ११.४५ वाजता घडली. वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यामुळे तिचा मुलगा व नातू मदतीला धावून आला. वेळीच रुग्णालयात हलविण्यात आल्याने ती वृद्धा बचावली. पोलिसांंनी मंगळवारी दुपारी गुन्ह्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
सावळीबाई सुका चव्हाण (८०) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने अंगावर घालत होती. सोमवारी रात्री तिने उकाडा वाढल्याने अंगावरील दागिने काढून ठेवले. तिच्या पायात दोन चांदीचे कडे होते. सावळीबाई अंगावर दागिने घालते हे माहीत असल्याने आरोपींनी तिच्यावर पाळत ठेवली. सोमवारी रात्री चाकूने तिचा गळा कापला व दुसऱ्याने पायातील ४० तोळे वजनाचे कडे काढून घेतले. आरोपी पसार होताच जखमी सावळीबाईने जीवाच्या आकांताने आरोळी ठोकली. घरात झोपलेला तिचा नातू व मुलगा धावून आला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. तिला तातडीने पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्काळ उपचार मिळाल्यामुळे सावळीबाईची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
छोट्या गावात घडलेल्या गंभीर घटनेचा पुसद ग्रामीण पोलिसांनी कसून तपास सुरू केला. यामध्ये आरोपी अजय हिरासिंग पवार (२२) रा. घोन्सरा व त्याचा मामेभाऊ श्रीपाल सुरेश राठोड (३२) रा. वानोली ता. महागाव यांचा समावेश आढळला. आरोपींना ताब्यात घेवून चौकशी करताच त्यांनी चोरीचा मुद्देमाल काढून देत गुन्ह्याची कबुली दिली.या दोघांनीही कर्जावर दुचाकी व मोबाईल खरेदी केला आहे. त्याची परतफेड करण्याची सोय नसल्याने आरोपींनी लुटपाट करण्याचा डाव रचला. यासाठी त्यांनी ८० वर्षाच्या सावळीबाईला हेरले व सोमवारी रात्री हल्ला केला. अशी कबुली आरोपींनी दिल्याचे ग्रामीण ठाणेदार मोतीराम बोडखे यांनी ‘लोकमत’ला सांगितली. या प्रकरणी आरोपींवर कलम ३०७, ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.