ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : येथून गुंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप असून या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.
राज्यातील प्रशासनाने आदर्श घ्यावा, असे विदर्भातील रस्ते केंद्रीय बांधकाम विभागाने तयार केले आहे. मात्र, याला महागाव ते गुंज रस्ता अपवाद आहे. हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळायला मार्ग नाही. याच रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ये-जा करतात. परंतु रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांचे त्यांना कोणतेही सोयरसुतक दिसत नाही.
पुसद ते धनोडा मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात रस्ता बांधकामात अनियमितता झाल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहे. अपघाताची शक्यता बळावली आहे. महागाव ते गुंज हे ११ किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी एक तासाचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. शिवाय वाहनाचे नुकसान होते. इंधन खर्चातही वाढ होते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप आहे.
बॉक्स
बांधकामाचे ऑडिट मागवावे
रस्ते बांधकामात झालेल्या अनियमितते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. या बांधकामासाठी वापरलेल्या निधीचे ऑडिट संबंधितांकडून मागविण्यात यावे, अशी जनभावना आहे.