अनेकांच्या हिशेबात घोळ : पावत्यांना कमालीचा विलंबवणी : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतन अदा करणारे वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा कारभार संपूर्णपणे आॅनलाईन करण्याची घोषणा शासनाने सन २०११ मध्ये केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील वेतनाचा भाग शालार्थ प्रणालीद्वारे आॅनलाईन करण्यात आला. मात्र जेथे प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लाखो रूपये गुंतवणूक म्हणून संचित आहे, तो भविष्य निर्वाह निधीचा भाग अजूनही आॅनलाईन झाला नाही. तो कधी होणार, याची प्रतीक्षा शिक्षक व कर्मचारी करीत आहे.सेवानिवृत्तीनंतर मोठी रक्कम हाती पडावी म्हणून खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठी गुंतवणूक करीत आहे. मात्र या योजनेत आपली किती रक्कम जमा झाली, याचा हिशेब वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडून दरवर्षी मिळत नाही. अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना मागील तीन-चार वर्षांपासून हिशेबाच्या पावत्या कार्यालयाने दिल्या नाही. शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी हा प्रश्न वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडला. मात्र सतत टोलवाटोलवी सुरू आहे. या विभागाला स्वतंत्रपणे अधीक्षक मिळत नसल्याने प्रभारी अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. यापूर्वी एका उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे अधीक्षकाचा प्रभार होता. त्यावेळी शिक्षकांनी त्यांच्याकडे रेटा लावला. त्यावेळी ‘मी तुमच्या चालू वर्षापर्यंतच्या पावत्या दिल्याशिवाय सेवानिवृत्त होणार नाही’, अशी ग्वाही एका सभेत त्यांनी जाहीरपणे दिली होती. मात्र अनियमित होणाऱ्या वेतनाला ताळ्यावर आणण्यासाठीच त्यांची सर्व ताकद खर्च झाली. ते उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. परंतु शिक्षकांना तीन-चार वर्षांपासूनच्या पावत्या मिळाल्या नाही. या कार्यालयातील कर्मचारी अर्थनितीकडे लक्ष ठेवून असल्याने त्यांना शिक्षकांच्या पावत्या तयार करायला सवड नाही. अनेक शाळांनी ‘गांधी’जींचा वापर करून २०१४-१५ पर्यंतच्या पावत्या तयार करूनही घेतल्याची माहिती आहे. आता नव्या उमेदीचे अधीक्षक या कार्यालयाला मिळाले आहे. त्यांनी एकेक खाते स्वत: तपासणे सुरू केल्याची चर्चा आहे. अनेक खात्यांच्या हिशेबामध्ये घोळ असल्याचे त्यांना आढळून येत आहे. काहींच्या व्याजात घोळ, काही खात्यामध्ये अतिप्रदान, सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते गहाळ अशा, बाबी त्यांना दिसून येत असल्याने नवीन अधीक्षकसुद्धा भांबावून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना पावत्या कधी मिळणार, याची शाश्वती नाही. पावत्या कधी मिळणार, या प्रतीक्षेत काही शिक्षक, कर्मचारी आता सेवानिवृत्तही झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरजबदलत्या काळानुसार आर्थिक कारभार करणाऱ्या लहान-लहान पतसंस्थादेखील संगणीकृत झाल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजना आॅनलाईन झाली आहे. कोल्हापूरसह काही जिल्ह्यातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालये पूर्णपणे आॅनलाईन झाले आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याचे वेतन व भविष्य निर्वाह निधी योजनेचे कार्यालय अर्धवटच आॅनलाईन झाले आहे. भविष्य निर्वाह निधी योजना आॅनलाईन झाल्यास शिक्षक व कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर आपल्या खात्याचा हिशेब पाहता येईल. तथापि यासाठी शिक्षकांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांकडेही नाही. माध्यमिकचे वर्तमान शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी हे कर्तव्यदक्ष व धडपणारे असल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे. त्यामुळे त्यांनी भविष्य निर्वाह निधी योजनाही आॅनलाईन करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शिक्षक व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
भविष्य निर्वाह निधी योजनेला जडली आॅनलाईनची अॅलर्जी
By admin | Published: April 16, 2016 1:49 AM