महागाव : ज्युनिअर महेंद्र कपूर म्हणून ओळख असलेले एन. सय्यद काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना विविध संघटनांतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
ज्युनिअर महेंद्र कपूर म्हणून लाखो रसिकांच्या मनावर राज्य करणारा उमदा कलाकार एन. सय्यद यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. गायक म्हणून कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्व-कर्तृत्वाने ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून व विविध कार्यक्रमांतून वेगळा ठसा उमटवला. एकटेपणा घालविण्यासाठी मनात गाणे गुणगुणत राहणे त्यांचा छंद होता. हा छंद त्यांनी व्यवसायाच्या स्वरूपात बदलला. स्वर मीलन म्युझिकल नाइट ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून हिंदी, मराठी गाणी गायली. महेंद्र कपूर यांचा हुबेहूब आवाज असल्यामुळे ज्युनिअर महेंद्र कपूर म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली होती. महागावच्या मातीची ताकत त्यांनी पुणे येथे आयोजित बालगंधर्व थिएटरमध्ये आजमावली होती.
४ मे रोजी सायंकाळी एन. सय्यद यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची वार्ता तालुक्यात पसरली. वयाच्या ५८ व्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले. त्यांनी व्यवसाय आणि छंद यामध्ये कधीही दुरावा येऊ दिला नाही. सोज्वळ स्वभाव, मितभाषी, संघटन कौशल्य या बळावर त्यांनी लोकप्रियता मिळविली. व्यवसायाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असलेल्या एन. सय्यद यांना अनेकदा संकटाशी सामना करावा लागला. त्यांनी गायकीमध्ये आपले नाव अजरामर केले. सतत हसतमुख व उमदा कलाकार गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाएवढे तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, मोठा भाऊ व मोठा आप्त परिवार आहे. तालुका व्यापारी महासंघ, तालुका पत्रकार असोसिएशन, महिला जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.