लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा व्हावी यासाठी शनिवारीही जिल्ह्यातील सर्व बॅंका सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी शेतकऱ्यांनी बॅंकांत गर्दी केली होती. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका बंदच राहिल्या. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या दिला. याच ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. अतिवृष्टीमुळे चार लाख शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीची घोषणा केली. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकारामुळे हा निधी थांबला होता. समान काम वाटून दिल्यानंतरही काही तालुक्यांमध्ये ग्रामसेवकांनी या कामामधून काढता पाय घेतला. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती झाली नव्हती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर कर्मचारी कामाला लागले. यानंतर शेतकऱ्यांना मंजूर झालेली रक्कम बॅंकांमध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु, याच वेळेस सर्व्हर आणि इतर काही अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झाले नाहीत. यातून गावस्तरावर प्रचंड संताप नोंदविला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
शेतकरी म्हणाले आता घरी काय सांगणार?- काही संतप्त शेतकरी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांच्या हातात पिशव्या होत्या. दुसऱ्या हातात पासबुक होते. गत चार दिवसांपासून बॅंकांच्या येरझारा मारत आहेत. मात्र, अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. आता दिवाळी कशी करू, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. सरकारच्या भरवश्यावर आम्ही दिवाळी करीत नाही; परंतु, सरकारच आश्वासन देते. यामुळे आम्ही बॅंकांमध्ये गेलो. मात्र, खात्यात पैसेच नाहीत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. पुढे सुट्या आहेत. बॅंकेत काय पैसे जमा होतील, शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी असल्याचे मत आत्माराम बेंडे, अनुप चव्हाण, चरणसिंग नाईक, बापू डोळे, अविनाश रोकडे, रामसिंग राठोड, देवराव राठोड, देवराव बांडबुजे आदींनी व्यक्त केले.
५०० शेतकरी परतले - जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंका सुरू राहतील, असे प्रसिद्धीपत्रक काढले. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंका अनेक ठिकाणी बंद होत्या. दारव्हा येथे ५०० च्या वर शेतकऱ्यांनी बॅंकेच्या बाहेर गर्दी केली होती. बॅंकच न उघडल्याने शेतकरी रिकाम्या हाताने परतले. ना नुकसानीची, ना पीकविम्याची मदत - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह पीकविमा आणि सानुग्रह अनुदान वाटपाची घोषणा सरकारकडून झाली; परंतु, रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळतीच झाली नाही. आरबीआयने बॅंक सुरू ठेवण्याचे निर्देशच दिले नाही.
राष्ट्रीयीकृत बॅंक सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यासाठी आरबीआयला विनंती केली. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही. काही ठिकाणी त्रुटी होत्या. २५ तारखेला बॅंक सुरू राहणार आहे. त्यावेळी बहुतांश खात्यात पैसे असतील. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी