हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दहावीत नापास म्हणजे कामातून गेलेला मुलगा... हाच सर्वसामान्य पालकांचा समज असतो. दहावीत एखादा गुण इकडे तिकडे झाला तरी मुलं थेट आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचताना दिसतात. पण दहावी म्हणजे आयुष्याची अंतिम परीक्षा नव्हे. हेच प्रत्यक्ष कृतीतून सांगणारे उदाहरण म्हणजे दिनेश काजळे नावाच्या विद्यार्थ्याची झगझगीत यशकथा. तो दहावीत एक नव्हे, तीन वेळा सपशेल नापास झाला. पण नंतर बारावीत तालुक्यातून पहिला आला. शेतात काबाडकष्ट उपसत हे यश मिळवल्यावर आता तो चक्क मंत्रालयात स्टेनोग्राफर झाला. अन् एमपीएससी देऊन ‘डीवायएसपी’ होण्याच्या ध्येयाकडे त्याची वाटचालही सुरू आहे.दिनेश काजळे हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील रुद्रापूर गावचा. वडील धनराज हे शेतकरी. शेती तीनच एकर. सोबत दुसऱ्याची शेती कसत भाजीपाल्याचे उत्पादन घेत कुटुंबाचा गाडा हाकत होते. दिनेश मोठा आणि त्याला एक भाऊ, दोन बहिणी.दहावीत नापास झाल्यानंतर दिनेश शेतात काम करु लागला. दुसऱ्याच्या शेतातही काम केले. तब्बल तीन वेळा नापास झाल्यावर तर अनेकांनी त्याला डिवचणे सुरू केले. तू पुढे शिकू शकत नाही, आता शेतातच काम करत जा, असे सल्ले मिळत राहिले. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. चौथ्या प्रयत्नात पास झाला. नंतर सायकलने आर्णीत येऊन कॉलेज केले.कॉलेज आणि शेतातील काम करत तो बारावीत ८३ टक्के गुणांसह तालुक्यातून पहिला आला. त्यानंतर डीएडही केले. नंतर ‘टायपिंग स्टेनो’ केले. मुक्त विद्यापीठातून बीए करत स्पर्धा परीक्षेचीही तयारी केली.या दरम्यान स्टेनोच्या जागाच अनेक वर्ष निघाल्या नाही. तो इतर चार विविध परीक्षेत पास झाला. परंतु शेवटी यंदा ११ मार्चला स्टेनोची परीक्षा दिली. ४ सप्टेंबरला निकाल आला. २४ सप्टेंबरला मुंबईमध्ये मंत्रालयात आदिवासी विकास विभागात लघूलेखक (स्टेनोग्राफर) म्हणून रुजू झाला.
इंग्रजीची भीती पळविलीग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांप्रमाणे दिनेशची वाटही इंग्रजीने अडविली होती. दहावीत इंग्रजीमुळेच तो तीन वेळा नापास झाला. चौथ्या प्रयत्नात इंग्रजीत कसेबसे ३५ गुण मिळवून त्याला दहावी सर करता आली. पण नंतर त्याने इंग्रजीवरच विशेष मेहनत घेतली आणि बारावीच्या परीक्षेत इंग्रजीमध्ये ६५ गुण पटकावले.
ग्रामीन भागातील तरुणांनी सुविधा नाही म्हणून निराश होऊ नये. मेहनत केल्यानंतर काहीच अशक्य नाही. मी आज स्टेनो म्हणून जरी रुजू झालो, तरी मला पुढे राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन ‘डीवायएसपी’ व्हायचे आहे.- दिनेश धनराज काजळे, आर्णी