लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस उग्र होत आहे. शुक्रवारी आणखी ३२ जणांचे अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता १०७ इतका झाला आहे. विशेष म्हणजे यातील १०६ रुग्ण हे अवघ्या सहा दिवसांत वाढले आहेत. कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. मागील सहा दिवसांतील कोरोना रुग्णांची संख्या पाहता येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रिय होण्याची भीती आता वर्तविली जात आहे. आठवडाभरातच कोरोनाने जिल्हावासीयांची चिंता वाढविली आहे. २ जानेवारी रोजी जिल्ह्यात सहा बाधित निष्पन्न झाले होते. त्यानंतर ३ जानेवारी रोजी यात चार रुग्णांची भर पडली. ४ जानेवारी रोजी आणखी ११ बाधित आढळले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ५ जानेवारी रोजी १९ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी ६ जानेवारी रोजी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर शुक्रवारी यात आणखी ३२ जणांची भर पडली. एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून १७४४ बेड उपलब्ध आहे. नागरिकांनी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.
बाधितांमध्ये यवतमाळ येथील २७ जणांचा समावेश- शुक्रवारी तपासणीसाठी पाठविलेल्या १,०६८ पैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात ११ महिला व २१ पुरुषांचा समावेश असून, त्यात पुसद तालुक्यातील चार, तर यवतमाळ येथील २७ जणांचा समावेश असून इतर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. - दरम्यान, शुक्रवारी दोघा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या १०७ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३ वर - मागील सहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही ९.२४ इतका झाला असून, दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ३ तर मृत्यू दर २.४५ एवढा आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, गर्दी जावू नये, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.