यवतमाळ - आर्णी येथील सराफा व्यापारी सदोबा सावळीवरून परत येत असताना ४ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता त्याचे वाहन रस्त्यात अडवून डोळ्यात मिरचीपूड टाकत बंदुकीचा धाक दाखवत तब्बल ३०७ ग्रॅम वजनाचे दागिने हिसकावून नेले होते. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा पथक व आर्णी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आरोपींचा माग शोधून काढला. उमरखेड येथून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमालही जप्त केला.
शेख निसार शेख उस्मान (३२), फैय्याज खान बिसमिल्ला खान (२८), शेख अफसर शेख शरीफ (३१), शेख जमीन शेख अयमुद्दीन (२४) सर्व रा. उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यांच्यासोबत असलेला एक साथीदार पसार आहे. या आरोपींनी सदोबा सावळी ते आर्णी असे अपडाऊन करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यावर पाळत ठेवून लुटमार केली. सराफा व्यापारी विशाल लोळगे सोन्याचे दागिने घेवून ४ मार्च रोजी सायंकाळी त्याच्या कारने आर्णीकडे येत असताना कापेश्वर फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाने सराफाची कार रोखली.
पाच आरोपी कारमधून खाली उतरले. यातील एकाने दगडाने काच फोडून सराफाच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकली. दुसऱ्याने बंदूक रोखली व चाकूचा धाक दाखविला. तिसऱ्याने बॅग हिसकावून घेतली व लगेच चारही जण पसार झाले. या प्रकरणात नंतर सराफा व्यावसायिकांनी आर्णी पोलिस ठाण्यावर धडक दिली होती. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, आर्णी पोलिस, सायबर सेल या सर्वांचेच पथक कामाला लागले. आरोपी उमरखेडमध्ये असल्याचा अंदाज येताच शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, चोरलेले सोन्याचे दागिने असा ऐवजही जप्त करण्यात आला.