गजानन अक्कलवार
कळंब : येथील एका शेतकऱ्यावर शेतातील वीज जोडणीच चोरीला गेली म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जोडणी नसतानाही बिल देण्याचा प्रताप येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
कळंब येथे खंड -१ मधील सर्व्हे नंबर २९७ हे नंदकिशोर महादेव दलाल यांच्या मालकीचे शेत आहे. २०१७ मध्ये त्यांनी शेतातील विहिरीवर मोटार पंपाकरिता वीज जोडणीची मागणी केली. त्यासाठी रीतसर अर्ज दिला. वारंवार कार्यालयात चकरा मारल्या. त्यानंतर आपल्या नावाने वीज कनेक्शन आल्याची माहिती त्यांना देण्यात आली; परंतु अद्याप त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे ते वैतागून गेले. मात्र, २०१९ पासून त्यांना विजेचे बिल नियमित दिले जात आहे. वीज जोडणी नसताना बिल कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांपासून वीज जोडणीची आस आहे. काही दिवसांपूर्वी परसोडी (बु.) येथील शेतकऱ्याने वीज जोडणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने आत्महत्येचा इशारा दिला होता. एवढेच नाही तर जोडणी करताना तोंड पाहून ती केली जाते, असा आरोपही करण्यात आला होता. येथील भोंगळ कारभाराचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बॉक्स
असा झाला भंडाफोड
शेतकरी नंदकिशोर दलाल यांना त्यांच्या ओळखीतल्या एका कर्मचाऱ्याने वीज बिल बाकी असल्याची माहिती दिली. मात्र, जोडणीच नसताना बिल कसे, असा त्यांना प्रश्न पडला. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन तपासणी केली. त्यात आपल्या नावाचे बिल पाहून त्यांना धक्का बसला. आता तरी त्वरित जोडणी करून द्यावी. एवढेच नाही तर या प्रकरणात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदकिशोर दलाल यांनी केली आहे. शाखा अभियंता अभिजीत भोयर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.