सभागृहात चौकशीची मागणी : खरेदी संशयास्पद, सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमकगजानन अक्कलवार कळंबमागील वर्षी कळंब ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर दरम्यान नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तेव्हा सामान्य फंडातून खर्च करण्यात आला. असे असताना पुन्हा तोच खर्च जून २०१६ मध्ये दाखविण्यात आला. अशाप्रकारे जवळपास दीड लाख रुपयांचा निवडणूक खर्च घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे.ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपातंर झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यापर्यंत राज्य शासनाकडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. येथील नायब तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यानच्या काळात निवडणूक कार्यक्रम घोषित झाला. परंतु निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध करुन दिला नाही. सुरुवातीला आपल्या स्तरावर निवडणूक खर्च करण्यात यावा. नंतर झालेला खर्च निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतला देण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात प्रशासकाच्या कालावधीत नगरपंचायतीच्या सामान्य फंडातून निवडणूक प्रक्रियेचा खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे, हा खर्च आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ या कालावधीतील आहे. दरम्यानच्या काळात जून २०१६ मध्ये आयोगाकडून नगरपंचायतीला १ लाख ८० हजार ११८ रुपये प्राप्त झाले. निवडणूक खर्च आधीच झालेला असताना पुन्हा तोच खर्च नव्याने जमा खर्च अहवालामध्ये दाखविण्यात आला. त्यामुळे प्रथमदर्शनी जवळपास पावणे दोन लाख रुपयांचा घोळ झाल्याचे दिसून येते. नव्याने संगणक खरेदी करणे, मंडप डेकोरेशन, स्टेशनरी, एन्टरप्राईजेस, झेरॉक्स, फोटोग्राफी आदी बाबीवर लाखो रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. परंतु हा खर्च पूर्णत: संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शनिवारी सर्वसाधारण सभेत बांधकाम सभापती आशीष धोबे यांनी निवडणूक खर्चात घोळ झाल्याचा विषय जोरदारपणे मांडला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला बहुतांश नगरसेवकांचा पाठींबा होता.
कळंब नगरपंचायतीचा निवडणूक खर्च घोटाळा
By admin | Published: September 18, 2016 1:34 AM