यवतमाळ - संपूर्ण जिल्ह्यात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला जात आहे. अशातच बुधवारी (20 फेब्रुवारी) रात्री 8.30 वाजता यवतमाळमधील वैभवनगर येथे दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत व्हिडीओ व्हायरल केला. या घटनेची लोहारा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शहरातील वाघापूर परिसरात बीपीएड अभ्यासक्रमाला असलेले जम्मू-काश्मीरमधील अनेक विद्यार्थी वास्तव्याला आहेत. बुधवारी रात्री वैभवनगरातील बुद्धविहारसमोर उमर रशीद दार (19), उमर नजीर गणई (19) दोघेही रा.कुपवाडा (काश्मीर) यांना बेदम मारहाण झाली. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना पकडून मारहाण व शिवीगाळ सुरू केली. तुम्ही काश्मिरात आमच्या सैनिकांवर दगड फेकता, त्यांना मारहाण करता, आता तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे धमकावत 10 ते 12 जणांनी मारहाण केली. या घटनेमुळे घाबरलेल्या काश्मिरी युवकांनी गुरुवारी सकाळी लोहारा पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, रात्री मारहाणीची घटना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह केली. तसेच दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर या मारहाणीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती. मागील दीड वर्षांपासून दोन्ही विद्यार्थी यवतमाळमध्ये वास्तव्याला असून वाघापूर परिसरातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे ते विद्यार्थी आहेत. मारहाण करून काश्मीरच्या घटनेचा निषेध नोंदविण्याचा प्रकार युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणात लोहारा पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.