शेख सत्तार अगवान : गुरूदेव भूषण पुरस्काराचे ३० रोजी वितरण पुसद : मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुखी व संपन्न भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी ग्रामगीता व इतर साहित्य निर्माण करून समाजाला दिशा दिली. ‘बोले तैसा चाले’, असे गुरूदेव भक्तांचे वर्तन असावे, असे आवाहन गुरूदेव भूषण पुरस्कारप्राप्त शेख सत्तार अगवान यांनी येथे केले. स्थानिक देशमुखनगरमधील सामूदायिक प्रार्थनास्थळी ‘राष्ट्रसंतांचे मानवतेचे विचार’ या विषयावर सत्तार अगवान बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव प्रा.प्रकाश लामणे होते. या प्रसंगी पुसद तालुका शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या गुरूदेव भूषण पुरस्काराची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. यंदाचा दुसरा गुरूदेव भूषण पुरस्कार मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा खंजिरी भजन व ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करणारे नंदकुमार पंडित यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रसंतांच्या जयंतीदिनी ३० एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी मनोहर बनस्कर, माधव जाधव, भगवान हातमोडे महाराज, नंदकुमार पंडित, प्रा.नंदकुमार खैरे, नरेश ढाले, ज्ञानेश्वर इंगोेले, गजानन जाधव, बाबासाहेब वाघमारे, गजानन पैठणकर, अनिल अस्वार, छाया लामणे, डॉ.सुलभा पिंजकर, मंगला पंडित, चंद्रभागाबाई लामणे, वैष्णवी लामणे आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
‘बोले तैसा चाले’ असे वर्तन ठेवा
By admin | Published: April 23, 2017 2:33 AM