लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले जातात. पण एखादी घटना घडल्याशिवाय त्यातील फुटेज तपासले जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने घटना घडो किंवा न घडो, सीसीटीव्हीचे फुटेज १५ दिवसातून किमान एकदा तपासलेच पाहिजे. शाळांमध्ये यंत्र बसविणे ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा यंत्रणेकडून उत्तम उपयोग होणे ही वेगळी गोष्ट आहे. यंत्र आणि ते वापरणारी यंत्रणा या दोन्ही बाबी एकत्र आणून काम झाल्यास विद्यार्थी अत्याचाराच्या घटना टाळता येतील, असे मत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी व्यक्त केले.येथील यवतमाळ पब्लीक स्कूलमध्ये बुधवारी पार पडलेल्या ‘‘चाइल्ड सेफ्टी-स्कूल अँड यू’ कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गुरग्राम येथील शाळेत प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या झाल्याने सध्या सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळांनी कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे, याचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ पब्लीक स्कूलमध्ये (वायपीएस) हा सेमिनार आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी रोहणे, प्राचार्य जेकब दास, पूर्वप्राथमिकच्या प्राचार्य निहारिका प्रभुणे आदी उपस्थित होते.पोलीस अधीक्षक एम. राज कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांनी आता ‘प्रोअॅक्टिव’ झाले पाहिजे. आपल्या शाळेच्या परिसरात, जवळच्या चौकात जाता-येताना काही आक्षेपार्ह प्रसंग, व्यक्ती आढळल्यास ताबडतोब व्यवस्थापनाला सांगितले. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे एकप्रकारे पालकच असतात. त्यामुळे त्यांनी अंतर ठेवून वागू नये. मात्र, नैसर्गिक स्पर्श आणि अनैसर्गिक स्पर्श यातील फरक ओळखून वागले पाहिजे. विद्यार्थ्यांचे ‘मॉरल पोलिसिंग’ करण्याचा अधिकार शिक्षकांनाच काय, पोलिसांनाही नाही. तो अधिकार केवळ त्यांच्या आईवडिलांनाच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित आक्षेपार्ह घटना घडल्याबरोबर शाळा व्यवस्थापनाने ताबडतोब आरोपीवर कारवाई करून पालकांना आपल्या बाजूने वळविले तर पुढील विघातक गोष्टी टाळल्या जाऊ शकतात.शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सिंगापूर दौºयातील अनुभव सांगत आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये शिस्त, स्वच्छता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी वायपीएसमध्ये उत्तम स्वच्छता राखली जात असल्याचे कौतुकोद्गारही काढले. मी जिल्ह्यातील साडेपाच लाख विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करतो. एकाही विद्यार्थ्यासोबत वाईट घडले, तर माझ्यावरही जबाबदारी येते. वायपीएससंदर्भात मागील वर्षी घडलेल्या घटनेत काही लोकांनी राईचा पर्वत केला. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले आहे, असे वंजारी यांनी सांगितले. उपशिक्षणाधिकारी रोहणे यांनी शिकविण्यापेक्षाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शिक्षकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा म्हणाले की, गुरुग्रामच्या घटनेने विद्यार्थी सुरक्षा हा विषय चर्चेत आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सर्वात जास्त आहे. गुरुग्रामच्या घटनेत सर्व शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाच्या सूचना येतील तेव्हा येतील, पण आपण सर्वात आधी सुरूवात केली पाहिजे. मागील वर्षीच्या घटनेनंतर आपल्या शाळेत सुरक्षेच्या काय-काय उपाययोजना करण्यात आल्या, त्यात काही कमतरता आहे काय, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकाºयांची ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. अशा घटनांमध्ये खासगी शाळांना सर्वाधिक ‘टार्गेट’ केले जाते. जिल्हा परिषद शाळांमध्येही अशा घटना घडल्या. मात्र एखाद्याकडे बोट दाखवून प्रश्न सुटत नाही. शालेय कर्मचारी आणि पालक सजग झाले पाहिजे. खासगी शाळांविषयी वातावरण कलुषित केले जात आहे. हा भ्रम दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा शाळा चालविणे कठीण होईल.यावेळी अँग्लो हिंदी हायस्कूलचे प्राचार्य मदनलाल कश्यप, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य मिनी थॉमस, हिंदी प्राथमिक शाळेचे राजेंद्र यादव यांच्यासह शिक्षक, पालक संघाचे अध्यक्ष आणि सदस्य आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जेकब दास यांनी केले. सूत्रसंचालन रूक्साना बॉम्बेवाला यांनी केले. तर अर्चना कडव यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिक्षक-पालकांच्या प्रश्नांना एसपींची उत्तरेघरून शिकून आलेली एखादी विचित्र गोष्ट विद्यार्थी शाळेतही करून पाहतो. तेव्हा शिक्षकांनी काय करावे?एसपी : मुलगा कुठे बिघडला हा मुद्दाच नाही. जिथे त्याची चूक ‘आयडेंटीफाय’ होईल, तिथूनच सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे.अनेकदा बदनामीच्या भीतीने पालक बोलायला तयार नसतात. पण विद्यार्थी काहीतरी सांगत असतो. मग शाळेने काय भूमिका घ्यावी?एसपी : अशावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याचे म्हणणे रेकॉर्डवर घ्यावे. त्याच्या वर्तनाचे निरीक्षण करावे. पालकांना विश्वासात घ्यावे. मुलाचा उल्लेख टाळून संबंधितावर कारवाईस सुरूवात करावी.अनेकदा मुलं खोटे बोलतात. पण पालक शिक्षकांपेक्षा मुलांवरच अधिक विश्वास ठेवतात. अशावेळी काय?एसपी : पालकांनी मुलांपुढेच शिक्षकांवर अविश्वास दाखविणे चूक आहे. शाळा व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. ‘आमच्या शाळेत मुलाला शिकवायचे असेल, तर आमच्या शिक्षकांशी व्यवस्थित बोला’ असे बजावले पाहिजे.आरटीईचा गैरवापर करत काही पालक शिक्षकांनी मुलाला मारल्याची खोटी तक्रार करतात...एसपी : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारूच नये. शिक्षा करायची असेल तर ती एकांतात करू नये. सर्वांपुढे करावी. तक्रार खोटी असेल, तर सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून अशा पालकाला ताळ्यावर आणता येते.
शाळेतले ‘सीसीटीव्ही’ सतत तपासत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 9:44 PM
अनेक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले जातात. पण एखादी घटना घडल्याशिवाय त्यातील फुटेज तपासले जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने घटना घडो किंवा न घडो, सीसीटीव्हीचे फुटेज १५ दिवसातून किमान एकदा तपासलेच पाहिजे.
ठळक मुद्देएम. राज कुमार : वायपीएसमध्ये ‘चाइल्ड सेफ्टी-स्कूल अँड यू’ कार्यशाळा