लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. मात्र, परीक्षा रद्द झाली म्हणून विद्यार्थी गाफील राहिल्यास येत्या काळात त्यांचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतो. विविध स्तरावरील प्रवेश प्रक्रिया व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी उपस्थित केला. गुणसुधार परीक्षा होणारचशालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार आहे. मात्र, जे विद्यार्थी याबाबत संतुष्ट नसतील, त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड घेईलच. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ठेवणे आवश्यक झाले आहे. जून-जुलैत परीक्षेच्या हालचालीकोरोनामुळे पुढील शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये परीक्षा घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. अशी परीक्षा झाल्यास आणि अनेक दिवस गाफील राहिलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते.अकरावीसाठी प्रवेश परीक्षाविद्यार्थी जेव्हा अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायला जाईल, तेव्हा साहजिकच कोरोनाचा फायदा घेऊन निव्वळ पुढे ढकललेल्या विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. शिवाय प्रवेश परीक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यासाठीही तयारी करावी लागणार आहे.
हा शैक्षणिक भ्रष्टाचारचज्या विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून अभ्यास केला, त्यांचे परीक्षा देण्याचे स्वप्न एका क्षणात हवेत विरले. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हा शैक्षणिक भ्रष्टाचारच आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी केली.