भाजपाप्रणीत आघाडी : शिवसेनेचे रवींद्र काळे उपाध्यक्षबाभूळगाव : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपा प्रणीत आघाडीच्या कोमल अंकीत खंते यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे रवींद्र काळे विराजमान झाले. कोमल खंते यांनी सोनाली तातेड यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाची शुक्रवारी निवडणूक झाली. त्यात भाजप प्रणीत आघाडीच्या कोमल खंते यांना नऊ मते तर सोनाली तातडे यांना आठ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रवींद्र रामचंद्र काळे यांना नऊ तर चंद्रशेखर सूर्यभान परचाके यांना आठ मते प्राप्त झाली. त्यामुळे काळे यांना विजयी घोषित करण्यात आले. स्वीकृत सदस्य म्हणून बाभूळगाव शहर सुधार आघाडीचे मनोहर शिवराम बुरेवार आणि काँग्रेसतर्फे नईम खान मनवर खान निवडले गेले. आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष व्हावा यासाठी भाजपा आमदार प्रा.डॉ. अशोक उईके आणि आमदार मदन येरावार गत दोन दिवसांपासून बाभूळगावमध्ये तळ ठोकून होते. नगरसेवकांच्या संपर्कात होते, अखेर त्यांना यात यश आले. निवडीनंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आमदार अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य अमन गावंडे, मनोहरराव बुरेवार, सतीश मानलवार, प्रकाश भुमकाळे, नितीन परडखे, सैय्यद जहीर, भिकुलाल गुप्ता, प्रभाकर वाघमारे, रामचंद्र खंते, प्रभाकर पोहेकर, बाबा खान, प्रभाकर माहुरे, आशीष गावंडे, अशोक रोम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नवीन सुनेला मिळाला प्रथम नागरिकाचा मानअवघ्या अडीच वर्षापूर्वी विवाह होऊन बाभूळगावातील खंते परिवारात दाखल झालेल्या कोमल अंकीत खंते यांना बाभूळगावच्या नागरिकांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून बहुमान बहाल केला. नेर तालुक्यातील खळना हे त्यांचे माहेर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कोमल यांचे शिक्षण बीएपर्यंत पूर्ण होताच बाभूळगाव येथील अंकीत खंते यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या वार्ड क्रमांक १५ मधील नागरिकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची त्यांना गळ घातली. त्यांनी अर्ज भरला आणि निवडूनही आल्या. नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाची खुर्ची चालून आली.
बाभूळगाव नगराध्यक्षपदी खंते
By admin | Published: November 28, 2015 3:21 AM