पुसद : पोळ्याच्या आधी हातात येणारा मूग, उडीद यावर्षी लांबलेल्या पावसाने खरीप पेरणीतून बाद झाला आहे. पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा उडीद, मूग यंदा पेरलाच गेला नाही. आता शेतकरी सोयाबीन पेरणीचे नियोजन करताना दिसत आहे.गतवर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्याने खरिपाची पेरणीही उरकली होती. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला पण अद्याप पेरणी योग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून यावर्षी प्रथम मूग, उडीदची पेरणी वेळ निघून गेल्याने शेतकऱ्यांना ही पिके घेता येणार नाहीत. त्याऐवजी सोयाबीन, तूर, कापूस आणि मका ही पिके घ्यावी लागणार आहेत. विदर्भात साधारणत: ७ ते २१ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होते. १५ जुलैनंतर खरीप पेरणी पूर्ण होते. पण यावर्षी मान्सूनने दगा दिल्याने संपूर्ण खरीप पेरणी धोक्यात आली आहे. मूग, उडीद पीक यंदाच्या पेरणीतून जवळपास बाद झाले आहे. याचे उत्पादन यावर्षी शून्य राहील.१५ जुलैपर्यंत पेरणी योग्य पाऊस झाला तर सोयाबीनची पेरणी करावी. त्यासोबतच आंतरपीक म्हणून तरू, कपाशी पीक घ्यावे. जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा बियाणे मिळणार नाही. पेरणी करताना बियाणे जास्त वापरावे. खताचा वापर कमी करावा. बदलते हवामान, पावसाचा खंड, कीड व रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.मान्सूनच्या लेटलतिफतेने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला असून खरीप ज्वारीची पेरणी होणार नसल्याने बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाणार. धान्य व गुरांसाठी चारा मिळणार नाही. बाजारात ज्वारीची आवक कमी मागणी जास्त होऊन भाव वाढतील. मूग, उडीद, डाळ यांचे भाव गगनाला पोहोचतील. सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडणार नाही. पाऊस लांबल्याने कपाशी, मका, सोयाबीन बियाणे जास्त प्रमाणात पेरावे व लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे खर्चात वाढ होऊन उत्पादनात मोठी घट येणार आहे, असे शेतकरीवर्गातून प्रतिक्रिया उमटत आहे. (तालुका प्रतिनिधी)
खरिपातून मूग, उडीद बाद
By admin | Published: July 07, 2014 12:10 AM