बोरगावची घटना : नागरिकांमध्ये दहशत फुलसावंगी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील बोरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ शेळ्या ठार झाल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. महागाव वनवर्तुळांतर्गत येणाऱ्या फुलसावंगी बिटमध्ये बोरगाव येथे सोमवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास गावालगतच्या शेतातील गोठ्यात नर व मादी जातीच्या बिबट्याने हल्ला केला. त्यांनी गोठ्यात दावणीला बांधून असलेल्या बकऱ्यांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात १३ बकऱ्या ठार झाल्या. या बकऱ््या दिनकर कोंडबाराव नप्ते यांच्या मालकीच्या होत्या. त्यांनी शेतातच शेळ्यांचा बांधला. सोमवारी ते शेळ्या दावणीला बाधून जेवण करण्यासाठी घरी गेले होते. शेतात कोणीच नव्हते. नंतर नप्ते घरून शेतात आले असता त्यांना गोठ्यातील शेळ्यांच्या मांसावर दोन बिबट ताव मारताना आढळले. त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील शेतातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली. त्यामुळे दोन्ही बिबट्यांनी जंगलाकडे पलायन केले. घटनेची माहिती फुलसावंगीचे सहायक वनक्षेत्रपाल एस.एच.संघई यांना कळविण्यात आली. वनक्षेत्रपाल एस.एच.संघई आणि वनपाल जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बकऱ््या ठार झाल्याने नप्ते यांचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
बिबट्याच्या हल्ल्यात १३ शेळ्या ठार
By admin | Published: February 22, 2017 1:13 AM