लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथे झाडावरील २ कावळे मृतावस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीत गेलं . कोरोनाची लस आल्याने काहीसा दिलासा मिळाला . अशातच मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आदी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पक्षी अचानक मारून पडल्याचं दिसून आले. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या घटना समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत २८५ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे समोर आले. पशु वैद्यकीय विभागाने या कोंबड्यांचे नमुने अकोला येथे पाठविले आहेत. या कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा अद्याप अहवाल आलेला नाही. अशातच यवतमाळ येथे झाडावरील २ कावळे मृतावस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱयांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. बर्ड फ्लूच्या भीतीने खव्वयांनी चिकनकडे पाठ फिरविल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पक्षांच्या मृत्यूचा नेमका अहवाल काय येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .