पुसद : आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. येथील कोमटी समाजाने नुकतीच त्यांची भेट घेऊन विविध समस्या निवेदनातून मांडल्या.
आर्य वैश्य (कोमटी) समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीला दिले. कोमटी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी शासनाने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून समाजाचे नेते नंदकुमार लाभसेटवार मागील सरकारच्या काळापासून प्रयत्नरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर, नांदेड, लातूर येथे आंदोलने करण्यात आली. अधिवेशन काळातही आंदोलन करण्यात आले होते. मात्र, शासनाकडून दखल घेतल्या जात नव्हती.
दरम्यान, नंदकुमार लाभसेटवार यांच्या नेतृत्वाखाली आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे गठन करण्यात आले. येथील अभिजित चिद्दरवार, सुरेंद्र कोडगिरवार, गजानन बेलगमवार, ब्रह्मानंद चक्करवार यांचा समावेश असलेल्या समितीने आमदार इंद्रनील नाईक यांची भेट घेतली. त्यांना समाजाच्या रास्त मागण्यांबाबत अवगत केले. त्यानंतर आमदार इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घेत समाजाच्या शिष्टमंडळासह अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री दालनात झालेल्या भेटीत आमदार नाईक आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार आदींनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आर्थिक विकास महामंडळाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार, सुरेंद्र कोडगीरवार, अभिजित चिद्दरवार, ब्रह्मानंद चक्करवार, गजानन बेलगमवार आदी उपस्थित होते.