कोविड सेंटर राळेगावची क्षमता शंभरची, सध्या एक रुग्ण भरती आहे.
राळेगाव : लोहारा रोडवरील सामाजिक न्याय भवनाच्या मोठ्या वसतिगृहात मागील वर्षीपासून कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. १०० रुग्णांना याठिकाणी भरती करण्याची सोय आहे. सध्या येथे केवळ एक रुग्ण दाखल असल्याचे दिसून आले.
दाखल रुग्णाकरीता १२० रुपये प्रतिदिन खर्च येतो. तो शासनाकडून नियमितपणे दिला जातो. इतर खर्चाचा निधी वरचेवर दिला जातो. कोणतीही देयके प्रलंबित नसल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात आवश्यक सर्वप्रकारचा औषधी साठा व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचे आजपर्यंत कधी काम पडले नाही. त्यामुळे बोलावण्यात आले नाही. भरती रुग्णांना वेळेवर चहा, नाष्टा, भोजन दिले जाते. त्याकरिता कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून गुणवत्ता राखली जाते. त्यावर वेळोवेळी देखरेख ठेवली जाते. त्यामुळेच रुग्णांना घरचा डबा बोलावण्याची गरज पडत नाही, अशी माहिती देण्यात आली.
या ठिकाणच्या परिसरात, रुग्णांच्या खोलीत स्वच्छता आढळून आली. रुग्णांना पिण्याचे पाणी खोलीतच पोहोचून दिले जात असल्याचे दिसले. रुग्णाला सुटी दिल्यानंतर त्याच्या घरापर्यंत रुग्णालयाच्या वाहनाने घरी सोडले जाते.
कोविड सेंटरवर तीन डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. भेटीच्या वेळी दोन डॉक्टर व तीन परिचारिका केंद्रावर सेवा देत असल्याचे दिसून आले. याठिकाणी आरटीपीसीआर चाचण्याचे नमुने घेतल्या जातात. पूर्वी या चाचण्यांचे अहवाल दहा ते १२ दिवस विलंबाने प्राप्त होत होते. मात्र, आता तिसऱ्या दिवशी अहवाल प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
कोविड रुग्णालय व तेथे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिसांचे नियमित संरक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच चाचणी अहवाल नेण्यासाठी, पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्या-नेण्यासाठी व रुग्णांना रेफर करण्यासाठी याप्रमाणे तीन वाहनांची या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ पाटील यांनी सांगितले.
बॉक्स
दोनवेळा जेवण, सकाळी नाष्टा व चहा दररोज वेळेवर दिला जातो. डॉक्टर नियमित तपासणी करतात. औषधोपचाराने आराम पडत आहे. डॉक्टर व इतरांची सौजन्याची वागणूक असल्याचे रुग्णालयात दाखल पुरुष रुग्णाने सांगितले.