अविनाश साबापुरे
यवतमाळ : महाराष्ट्राला ज्ञानाचा प्रकाश दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते साकार करणाऱ्या जिजाऊ माँसाहेब या दोन महानायिकांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात दहा दिवस ज्ञानदिव्यांची दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी तरुणांनी चित्रमय आकाशदिवे साकारले असून या दिव्यांसाठी गावोगावी नोंदणी करण्यात आली आहे. घरोघरी हे आकाशकंदिल उजळणार असल्याने ३ ते १२ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात विचारांची दिवाळी अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रातील काही तरुणांनी एकत्र येत ‘संविधान प्रचारक’ अशी चमू तयार केली आहे. या चमूमार्फत मागील वर्षीपासून महानायिकांच्या आकाशकंदिलाचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी केवळ २०० आकाशकंदिल त्यांना पोहोचविता आले. परंतु, यंदा त्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी करून मोठ्या प्रमाणात हे कंदिल गावोगावी पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक तयार केले आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत काही हजारांपेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ३ जानेवारी, सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ माॅसाहेब जयंतीपर्यंत हे दिवे घरोघरी लावून, रांगोळी काढून ‘सावित्र जिजाऊ’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन या चमूने केले आहे.
- आकाशकंदिलांचे वैशिष्ट्य
संपूर्णपणे कागदी असलेल्या या आकाशकंदिलांवर दोन बाजूंनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माॅसाहेबांची प्रतिमा आहे. तर उर्वरित दोन बाजूंवर फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, झलकारी बाई, इंदिरा गांधी या महानायिकांच्या प्रतिमा आहेत.
रोज सांगणार एका महानायिकेची गोष्ट
३ ते १२ जानेवारी या सप्ताहात सोशल मीडियाच्या माध्यमातून दरदिवशी गोष्टरूपात महानायिकांच्या कार्यजीवनाची कथा घराघरांत पोहोचविली जाणार आहे. सावित्रीबाई, जिजाऊ, फातिमा, अहिल्या, रमाई, ताराबाई, इंदिरा, झलकारी, मदर तेरेसा, अशा महानायिकांचे जीवनचरित्र कथाकथनाच्या उपक्रमातून पुढे आणणार असल्याचे संविधान प्रचारक चमूकडून सांगण्यात आले.
हा उत्सव कुटुंब स्तरापासून ते संस्थात्मक व सामाजिक स्तरावर साजरा होणार आहे. आपल्या महानायिकांचे विचार व कार्य घरोघरी पोहोचवणे हा यामागील उद्देश आहे. या उत्सवात कंदील, दिवे लावून, गोडधोड करून उत्साहाने महानायिकांचा उत्सव साजरा व्हावा. ही विचारांची दिवाळी आहे.
- देवीदास शंभरकर, उपक्रमाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक