पुसद : उपविभागात कोरोना महामारीचा फटका कुल्फी विक्रेते, वाहनचालक, सलून व्यावसायिक, फेरीवाले, आईस्क्रिम व्यावसायिक आदींना बसला आहे. हे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. या उद्योगातील व्यावसायिकांसह काम करणाऱ्या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
या व्यवसायातील लोकांना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे... असे म्हणण्याची वेळ आली आहे. उपविभागातील दिग्रस व पुसद या तालुक्यातील कोरोना वाढीचा आलेख सुरुवातीपासूनच उंचावलेला आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन लागल्याने उपविभागातील ऑटोरिक्षा, काळी-पिवळी आदी वाहन चालक, मटका कुल्फी विक्रेते, फेरीवाले, सलून व्यावसायिक, आईस्क्रिम विक्रेते आदींसह मजूर पुरते अडचणीत आले आहेत. रोज मर मर करून पोट भरणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या वेदनांना तर पारावार नाही.
येथील दीपक आगलावे या मटका कुल्फी चालकाने डोळ्यात अश्रू आणून या अर्धमेल्या व्यवसायाची कहाणी सांगितली. उन्हाळ्यात मटका कुल्फी, आईस्क्रिम फेरीवाले आदींचे व्यवसाय मोठे तेजीत असतात. मटका कुल्फी व आईस्क्रिमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र लॉकडाऊनमुळे या व्यवसायासह हातगाड्यांवरील मटका कुल्फी, आईस्क्रिम विक्रेत्यांचेही कंबरडे मोडले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मागीलवर्षी आणि यंदाही नेमका उन्हाळ्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम सलून व्यवसाय, वाहन चालक, फेरीवाले, मटका कुल्फी व आईस्क्रिम विक्रेते आदींवर झाल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
कोरोनामुळे थंड, आंबट पदार्थांची मागणी घटली
यंदा ब्रॅण्डेड आईस्क्रिमला २० टक्के मागणी असून मटका कुल्फी व्यवसाय तर पूर्णत: बुडाला आहे. सलून व्यावसायिक, वाहन चालक, फेरीवाले आदींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थंड पदार्थ, आंबट खाणे नागरिक टाळत असल्याने मटका कुल्फीसारखे व्यवसाय कोलमडले आहेत, असे माधव पाटील यांनी सांगितले.