गजानन अक्कलवार - कळंबयेथील १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत पाच-सहापेक्षा अधिक महिला सदस्य नसायच्या. परंतु नुकत्याच काढण्यात आलेल्या आरक्षणात नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यामुळे पहिल्यांदाच महिलांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने कळंब ग्रामपंचायत प्रशासनाची कमान येणार आहे. विद्यमान स्थितीत केवळ सहा महिला सदस्य आहे. यात अरुणा चांदोरे, रिता वाघमारे, सुनीता डेगमवार, गुंफा आसुटकर, सुभद्रा नेहारे आणि रेखा उईके यांचा समावेश आहे. पुढे होणाऱ्या निवडणुकीत नऊ महिला सदस्य राहणार आहे. एवढेच नाही तर, महिलांना कुठल्याही वॉर्डातून लढण्याची मुभा राहणार आहे. त्यामुळे पुरुषांसाठी खुल्या मतदार संघातूनही महिला सदस्य निवडून देण्याची संधी आहे. त्यामुळे महिलांची संख्या आपोआपच वाढणार आहे. यापुढे महिलांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही ठराव पारित करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कळंब ग्रामपंचायतीवरील पुरुषांची आतापर्यंतची मक्तेवारी संपुष्टात येणार आहे. वार्ड क्र.१ चे ओबीसी, खुला महिला आणि खुला पुरुष, असे आरक्षण निघाले आहे. वार्ड क्र. २ मध्ये केवळ दोन जागा आहे. यात ओबीसी आणि खुला महिला असे आरक्षण आहे. वार्ड क्र.३ मध्ये एसटी व ओबीसी महिला आणि खुला पुरुषाचे आरक्षण निघाले आहे. वार्ड क्र. ४ मध्ये एसटी व ओबीसी पुरुष तसेच एससी स्त्रीला निवडणूक लढविता येणार आहे. वार्ड क्र. ५ मध्ये खुला पुरुष दोन आणि एक खुला महिला असे आरक्षण आहे. वार्ड क्र.६ चे ओबीसी आणि खुला स्त्री व एससी पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणात अनेक परंपरागत नेत्यांना हादरा बसला आहे. विद्यमान सरपंचासह अनेक मातब्बर सदस्यांना आपला वॉर्ड सोडावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डातून लढण्याची जोखीम पत्करावी लागणार आहे. निवडणुकीच्यादृष्टीने इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
कळंबमध्ये येणार महिला राज
By admin | Published: July 10, 2014 11:54 PM