आर्णी (यवतमाळ) : शहरातील हॉटेलमध्ये कामाला असलेल्या दोघांमध्ये सोमवारी रात्री वाद झाला. या वादात डोक्यात दगड घालून दुसऱ्याला जीवानिशी ठार करण्यात आले. मोबाईल चोरीचा आळ का घातला यावरून ही गंभीर घटना घडली. जखमी अवस्थेत युवकाला सावंगी मेघे येथे दाखल केले. तेथे त्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रिजवान बेग कयूम बेग (रा. आर्णी) याने त्याच्यासोबत काम करणारा आरोपी सैयद बाबू सैयद गफूर (५०, रा. मोमीनपुरा) याच्यावर मोबाईल चोरल्याचा आळ घेतला. यावरून दोघांमध्ये सोमवारी रात्री वाद झाला. दोघांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले असे वाटले. मात्र, मनात राग असलेल्या सैयद बाबू याने रिजवान बेग हा झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घातला. यात रिजवान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने यवतमाळ येथे आणण्यात आले. शासकीय रुग्णालयातून सावंगी मेघेला हलविण्यात आले. तेथे रिजवानचा उपचारात मृत्यू झाला.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मंगळवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळ गाठले. सुरुवातीला या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होता. आता त्यात बदल करण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सैयद बाबू सैयद गफूर याला पोलिसांनी अटक केली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून थेट खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
चोरीचा आळ घेऊन डिवचणे भोवले
रिजवान हा आरोपी सैयद बाबू याला मोबाईल चोरीचा आळ घेवून नेहमीच डिवचत होता. चार चौघात त्याच्याकडून होणार अपमान सहन न झाल्याने गुन्हा घडला.