लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रवाशांकरिता बहुतांश आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. नाश्ता-पाणी करायचे असेल तर बाहेर जावे लागते. नातेवाइकांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागेचेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे किमती वाहन बेवारस ठेवावे लागणार आहे. फलाटावर कोणती बस लागली हे माहीत करून घेण्यासाठी चौकशी कक्षाजवळ जावे लागणार आहे. याशिवाय अनेक सुविधांचा अभाव असताना यवतमाळच्या नवीन बसस्थानकाचे लोकार्पण सोमवारी केले जात आहे.
पाच वर्षांपासून हाल सहन करत असलेल्या प्रवाशांना नवीन बसस्थानकातही आखणी काही काळ त्रास सहन करावा लागेल, असे चित्र आजतरी दिसून येत आहे. २०१९ मध्ये नवीन बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले. प्रवाशांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच नवीन बसस्थानक सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, त्याआधीच उद्घाटनाचा मुहूर्त साधला जात आहे.
प्रवाशांना पिण्यासाठी बोअरचे पाणी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकात शुध्द आणि थंड पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. टाक्यांमध्ये जमा केलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. अनेक प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी सकाळीच घरून निघतात. नाश्ता करण्याची इच्छा झाल्यास त्यांना बसस्थानकाच्या बाहेर जावे लागणार आहे. बसस्थानकातील कँटीन सुरू होण्याची सध्यातरी कुठलीही चिन्हे दिसत नाही.
बसस्थानकातून वाहन चोरीच्या घटना अधिक घडतात. अशावेळी नागरिक आपले वाहन सुरक्षित ठेवण्याची जागा शोधतात. नवीन बसस्थानकात ही व्यवस्थाही पूर्ण झालेली नाही. वाहनतळाचे अजूनही बांधकामच सुरू आहे. यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.
बसस्थानकाच्या इमारतीवर यवतमाळ मध्यवर्ती बसस्थानक असे नावही लिहिण्यात आलेले नाही. फलाटावरची नावे तेवढी लिहून तयार झालेली आहेत. दुकान गाळे सुरू होण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत वस्तू खरेदीसाठी बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. मंगळवारपासून नवीन बसस्थानकावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु, काही बाबतीत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
११ महिन्यांत करायचे होते काम यवतमाळ येथील नवीन बसस्थानकाच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. ११ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते. प्रत्यक्षात पाच वर्षाचा कालावधी लागला. कोरोना, न्यायालयीन प्रक्रिया आदी कारणांमुळे बांधकामाला विलंब झाल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. १७ फलाटांवर बसेस लागतील, अशी माहिती देण्यात आली.