जिल्ह्यात आरडाओरडा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर वितरणासाठी नवीन पद्धत राबविली. मात्र, ही नवीन पद्धतही कागदावरच आहे. कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन दिली आणि रुग्णालयातील रुग्णांना किती रेमडेसिविर मिळाले, याचा कोणताही हिशेब अन्न व औषध प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ही इंजेक्शन जातात कुठे, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करीत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज सरासरी हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करतात, पण तेथेही रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी नातेवाईक शहरभर फिरत असतात. मात्र, इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलला दिले जातात, असे प्रशासन सांगते. हे सर्व तोंडी आदेशावरून चालले आहे. डॉक्टरांनाही हे माहीत असताना नातेवाइकांना डिस्क्रिप्शन कसे देतात, हा मोठा प्रश्न आहे.
शहरामध्ये रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे. रेमडेसिविर वेळेत मिळत नसल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर व लस उपलब्ध होत नसल्यामुळे मेडिकल दुकानाकडे मागणी वाढली. मात्र, स्टॉक संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
वास्तविक, पुसदसारख्या शहरात रेमडेसिविरचा साठा मुबलक असायला पाहिजे होता. मात्र, पुसदमधली काही लोक बाहेरगावी जाऊन इंजेक्शनची खरेदी करीत आहेत. मुळात येथे पुरवठाच कमी होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा योग्य होत आहे का, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे का, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एफडीएची आहे. मात्र, रुग्णाचे नातेवाईक त्रस्त असताना, शासन, प्रशासनाकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.
बॉक्स
पुसदची आरोग्य यंत्रणा कोलमडली
वेळेत रेमडेसिविर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णाची परिस्थिती बिघडत असून, यावर प्रशासन गप्प आहे. आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलमडली आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस सर्व लसीकरण केंद्रे बंद होते. नागरिकांना लस मिळणार की नाही, याबाबतची काहीच माहिती देण्यात आली नव्हती. सकाळी लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर नागरिकांना आज लस उपलब्ध नाही, याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.