लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती वॉर्डात प्रसूत झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला.वैद्यकीय महाविद्यालयात क्र.७ व ८ हा प्रसुती वॉर्ड आहे. तेथे महिलांची प्रचंड गर्दी आहे. उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने जागेअभावी दोन खाटांच्या मधल्याभागी गाद्या टाकून सिझरिनच्या महिलांवर उपचार केले जात आहेत. नवजात बाळांनाही तेथेच खाली जमिनीवर बेडवर ठेवले जात आहे.या बाळांच्या बेडच्या आजूबाजूला मुंग्या, माकोडे फिरत असल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी दुपारी संकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. बाजूचा वॉर्ड क्र.६ रिकामा असताना महिला रुग्णांना तेथे का हलविले जात नाही या मुद्यावर या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांना जाब विचारला. त्यानंतर डॉ. श्रीगिरिवार यांनी विभाग प्रमुख चव्हाण यांना सूचना दिल्या व वॉर्ड क्र.७, ८ मधील जमिनीवर उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णांना वॉर्ड क्र.६ मध्ये हलविण्यास सांगितले. तेथेही बेड कमी पडल्यास वेळप्रसंगी एका बेडवर दोन रुग्ण ठेवावे, मात्र महिला व बाळांवर जमिनीवर ठेऊन उपचार करू नये, अशा सूचना अधिष्ठातांनी दिल्या. अधिष्ठातांशी चर्चेच्या वेळी संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, आकाश भारती, रवी माहुरकर, मनिष इसाळकर, विनोद नराळे, गोलू डेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. लगतच्या वाशीम, नांदेड, माहूर, आदिलाबाद, अमरावती या जिल्ह्यातून रुग्णांची मोठी गर्दी होते. त्यातील किमान १०० रुग्ण रोज उपचारार्थ दाखल होतात. महाविद्यालयाची क्षमता लक्षात घेता येथे खाटांची संख्या नेहमीच कमी पडते.पावसाळ्यामध्ये सहसा साथीच्या आजाराच्या रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याने अनेकदा एका बेडवर दोन रुग्ण किंवा जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येते. परंतु आता नवजात बाळांवरही जमिनीवर उपचार केले जात असल्याने रुग्णाचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येकी ३० बेड क्षमतेचे तीन वार्ड आहे. त्यानंतरही जागा अपुरी पडते. पर्यायी व्यवस्थेसाठी नवीन बांधकाम सुरू आहे. लवकरच यावर उपाय केले जाईल.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, मेडिकल कॉलेज
प्रसूत महिला, बाळांवर चक्क जमिनीवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:29 PM
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती वॉर्डात प्रसूत झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला.
ठळक मुद्देप्रसुती वार्डातील संतापजनक प्रकार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय