लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे या योजनेत अर्ज दाखल करणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या योजनेत दररोज अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने ३१ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे ज्या महिला लाभार्थीना अजूनपर्यंत अर्ज दाखल करता आले नव्हते, अशा महिला लाभार्थीना अर्ज दाखल करता येणार आहे.
या योजनेत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात चार लाख ६७ हजार ७१३ महिलांनी आपली नोंद केली होती. यापैकी चार लाख ६३ हजार ६७१ महिलांचे अर्ज या योजनेत समाविष्ट करण्यात आले. उर्वरित अर्जाची आता छाननी केली जात आहे.
तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख २१ हजार ३१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. दोन लाख ११ हजार ३४४ अर्ज पात्र ठरले आहेत. या अर्जदारांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. मुदत वाढल्याने तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हा आकडा सात लाख लाभार्थीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या योजनेत पूर्वी जुने पोर्टल वापरले जात होते. आता या योजनेसाठी नवीन पोर्टल लाँच झाले आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. यासोबतच अंगणवाडीताईंकडे अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना महिला बालकल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
उत्सवातही महिलांचे लोंढे शहराकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लभार्थीचे लोंढे दररोज शहराकडे वळत आहेत. सण-उत्सवांत शासकीय कार्यालयांत गर्दी कमी असते. यामुळे कामकाज लवकर होईल म्हणून शासकीय कार्यालयांत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांनी सण-उत्सवांत गर्दी वाढवली आहे. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवरही झाला आहे.