लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील लखमापूर येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या २८ वर्षीय महिलेचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार व निष्काळजीपणा उघड झाला आहे.वृंदा रवींद्र सलाम रा.दहेगाव (कुंभा) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत वृंदा माहेरी प्रसुतीसाठी आली. तिला रात्री प्रसुतीकळा सुरू झाल्याने वणी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तिची प्रसुतीही झाली. मात्र तिची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तिला चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात रेफर केले. तेथे उपचार बरोबर होत नाही म्हणून कुटुंबियांनी तिला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंगणवाडी केंद्रातून मिळणाऱ्या संदर्भ सेवा, पोषण आहार, गरोदर माताची नियमित आरोग्य तपासणी, रूग्णालयात प्रसुती, आरोग्य विभागाकडून प्रसुतीपूर्व, प्रसुतीपूर्व सर्व सुविधा पुरविल्या जात असताना असे दुर्दैवी मृत्यू होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लखमापूरच्या महिलेचा प्रसूतीपश्चात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 9:51 PM