ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महामार्गाच्या विस्तारीकरणाने आलेल्या आर्थिक सुबत्तेचे पाट आता मटका आणि जुगार अड्ड्यांवर वाहताना दिसत आहे. लाभार्थ्यांच्या गर्दीने अड्डे फुलले असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कधी नव्हे तो हाती आलेला गडगंज पैसा अशा पद्धतीने उधळला जात असल्याचे दृश्य महागाव, उमरखेड तालुक्यात दिसून येत आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूची शेतजमीन संपादित करण्यात आली. महागाव तालुक्याची सीमा असलेल्या भोसापासून उमरखेड शहरापर्यंत भूसंपादनाचे अवार्ड झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत आहे. साधारणत: दोनशे कोटी रुपये मोबदल्याच्या स्वरूपात या दोन तालुक्यात येत आहे. त्यातील बहुतांश शेतकºयांना मोबदला मिळाला आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने अनेक लाभार्थी आता सुख वस्तू खरेदीच्या मागे आहे. अनेकांनी चारचाकी वाहने, बुलेट आणि एलईडी टीव्ही खरेदी केल्या आहे. यानंतरही गडगंज पैसा या लाभार्थ्यांजवळ आहे. काही मेहनती लाभार्थ्यांनी या पैशातून विकासाची वाट चोखाळत शेती खरेदी केली आहे. परंतु अनेक लाभार्थी पैसा कसा उधळता येईल यावरच जोर आहे.हॉटेल-ढाब्यांवर रेलचेलराष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर रात्रीच्या वेळी अशा लाभार्थ्यांची रेलचेल दिसून येते. लाभार्थ्यांना आलेली आर्थिक सुबत्ता कॅश करण्यासाठी आता या दोन तालुक्यात गावोगावी मटका, जुगाराचे अड्डे फुलले आहे.धनोडातील अड्डा कुप्रसिद्धधनोडा येथील अड्डा तर कुप्रसिद्ध आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शौकीन या ठिकाणी सकाळपासूनच ठाण मांडून असतात. त्यासोबत महागाव, फुलसावंगी, काळी, पोखरी, गुंज, मुडाणा, हिवरा या ठिकाणीही मटका आणि जुगाराचे अड्डे तेजीत आहे. या अड्ड्यांवर येणाºया लाभार्थ्यांना सर्व सुख-सुविधा पुरविल्या जात आहे. अनेक लाभार्थी जुगार आणि मटक्याच्या नादी लागून बर्बाद होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.पोलिसांची केली बोलती बंदपोलिसांना हा सर्व प्रकार माहीत आहे. परंतु आर्थिक संबंधातून या अड्ड्यांवर कारवाई केली जात नाही. कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यंत सर्वांची बोलती बंद करण्याची ताकद या अड्डे चालकात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कुणी ब्र शब्दही काढत नाहीत.तीन तालुक्यांचा खायवाड महागावातमहागाव, उमरखेड आणि पुसद या तीन तालुक्यातील मटक्याचा खायवाड महागावात राहतो. परंतु आजपर्यंत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेच नाही. यावरूनच सर्व काही सिद्ध होते. पोलिसांना टार्गेटसाठी असलेल्या केसेस दिल्या की सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसून येते.मराठवाड्यातील गर्दी विदर्भात, धनोडा मुख्य केंद्रमहागाव तालुका विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या जिल्ह्यातून सर्व अवैध व्यवसाय हद्दपार केले आहे. त्यामुळे येथील अड्डे चालक पैनगंगा ओलांडून विदर्भात येत आहे. दररोज ठिकठिकाणच्या अड्ड्यावर ही मंडळी आपला शौक पूर्ण करताना दिसत आहे. सर्वाधिक गर्दी धनोडा येथील पैनगंगा पात्रातील अड्ड्यांवर दिसून येते. या अड्ड्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच एक खळबळ उडाली. खुद्द पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश महागाव ठाणेदारांना दिल्याची माहिती आहे. कारवाईनंतर काही दिवस बंद राहणारे अड्डे पुन्हा नव्या जोमाने सुरू होतात.
भूसंपादन पैशावर मटका-जुगार चालकांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:03 PM
महामार्गाच्या विस्तारीकरणाने आलेल्या आर्थिक सुबत्तेचे पाट आता मटका आणि जुगार अड्ड्यांवर वाहताना दिसत आहे. लाभार्थ्यांच्या गर्दीने अड्डे फुलले असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : गावागावांत लाखोंची उलाढाल, प्रकल्पग्रस्तांना केले जातेय कंगाल