यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात दीर्घकाळ सेवा दिलेले आणि सध्या अमरावती परिक्षेत्रात नेमणुकीस असलेले अनेक दिग्गज ठाणेदार सध्या यवतमाळच्या वाटेवर आहेत. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्यात सेवा बजावतात. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करून घेऊन निवडणुकीनंतर पुन्हा पूर्वीच्या जिल्ह्यात एन्ट्री करतात. हे अधिकारी जिल्हाच काय परिक्षेत्रही सोडून जात नाही. विधानसभेपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील असेच काही दिग्गज ठाणेदार जिल्हा-परिक्षेत्राबाहेर गेले होते. तेच अधिकारी आता पुन्हा यवतमाळ जिल्ह्यात येण्यासाठी फिल्डींग लावून आहेत. अकोला, नागपूर, बुलडाणा, चंद्रपूर, सांगली या जिल्ह्यातील सात ते आठ अधिकाऱ्यांनी यवतमाळवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातील एक-दोघांनी तर थेट स्थानिक गुन्हे शाखाच टार्गेट केली आहे. काहीही झाले तरी आणि कितीही रॉयल्टी भरा लागली तरी पुन्हा एलसीबीतच बसायचे असा चंग या अधिकाऱ्यांनी बांधला आहे. तर सांगलीतून येऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांनी पांढरकवड्यासाठी ‘गव्हर्नमेंट डिझायर’ आणण्याचीही तयारी चालविली आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या मुंबईसह बाहेरील अधिकाऱ्यांनी पुन्हा महानगरात किंवा जवळपास परतता येते का या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
परिक्षेत्रातील दिग्गज ठाणेदार यवतमाळ जिल्ह्याच्या वाटेवर
By admin | Published: January 14, 2015 11:15 PM