यवतमाळ : भूमिअभिलेख कार्यालयात प्रचंड अनागोंदी आहे. सर्वसामान्यांची कामे सहजासहजी केली जात नाही. घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्याने शेतजमीन मोजण्यासाठी अर्ज केला. मात्र जमीन मोजण्याकरिता भू-करमापकाने २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती त्याने दहा हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी एसीबीचे पथक सापळा लावून होते. आरोपीला रंगेहात अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी घाटंजी शहरातील नगर परिषदजवळ चहा कॅन्टीवर झाली.
रजिकोद्दीन नाजीमोद्दीन काझी (३९) असे या भू-करमापकाचे नाव आहे. तो घाटंजी तालुका उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्यासोबत खासगी व्यक्ती रामचंद्र दशरथ किनाके (३८) रा. बोदडी याला पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्याने गावठाणापासून २०० मीटरच्या आत असलेली शेतजमीन मोजून मिळावी याकरिता अर्ज केला. शेत मोजणीचा अहवाल त्यांना तहसीलदारांकडे सादर करायचा होता. मात्र भू-करमापक काझी याने २० हजार रुपयांची लाच मागितली. ९ नोव्हेंबरपासून येरझारा मारुन शेतकरी त्रस्त झाला. शेवटी त्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबरला तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. आरोपी व त्याच्या मदतीला असलेल्या खासगी व्यक्तीने पंचासमक्षच रोख रक्कम स्वीकारली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, अब्दूल वसीम, चालक सतीश किटकुले यांनी केली.भूमिअभिलेखमध्ये पैशासाठी अडवणूक
सर्वसामान्य नागरिकांना भूमिअभिलेख कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजण्याशिवाय पर्याय नाही. शासनाचे अधिकृत शुल्क भरूनही भूमिअखिलेख कार्यालयात जागोजागी अडवणूक केली जाते. संबंधितांना पैसे दिल्यानंतरच कागद हलतो. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.