जीवनाच्या वाटेवर लोभाचा क्षण कधी चूक करण्यास भाग पाडेल हे सांगता येत नाही. पती, मुलगा आणि सर्व काही आलबेल असताना एखादी महिला कुणाच्या भूलथापेला बळी पडल्यानंतर काय भयंकर परिणाम होतात, याची प्रचिती सूरजनगरातील विवाहित महिलेच्या हत्याकांडातून येते. पपिता कांबळे (३८) असे या मृत महिलेचे नाव आहे. पपिता ही मूळची डोंगरखर्डा येथील आहे. तिची गावातीलच महाविद्यालयातील शिक्षकाशी ओळख झाली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या शिक्षकाची पहिली पत्नी आजारपणाने दगावली. दरम्यान गरीब कुटुंबातील पपिताशी त्याने विवाह केला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा नंतर पपितापासून दुसरा मुलगा अशी दोन फुल त्यांच्या संसारवेलीवर आली. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू होते. याचदरम्यान पपिताच्या पतीचा अपघात झाला. यातून तो काही महिन्यांनी सावरला. याच काळात पपिताची वाट चुकली. त्यानंतर पती-पत्नींचे खटकेही उडू लागले. सामाजिक प्रतिष्ठा जोपासत असताना पपिताला पतीकडून अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे तर पपिताच्या माहेरच्या मंडळींनीही तिची समजूत काढली. मात्र त्याउपरही पपिताचे चालचलन बदलले नाही. शेवटी एकाच घरात पती-पत्नी विभक्तपद्धतीने राहू लागले. पपिता रोजमजुरीसाठी भोसा येथे एका कारखान्यात कामाला जावू लागली. तेथे विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील एक विधवा महिलाही कामाला येत होती. त्यातून दोघींची ओळख झाली. या महिलेचा मुलगा सूरज नामदेवराव भोसले (२९) याच्याशी पपिताची जवळीक आली. तेथूनच या दोघांचे संबंध वाढत गेले. पपिता कारखान्यातील मजुरांना हात उसनवारीवर पैसेही देत होती. बऱ्याच ठिकाणी तिने छोट्या-छोट्या रकमांचे आर्थिक व्यवहार केले होते. पती मुलांना घेऊन नागपूर ेयेथे विवाह समारंभासाठी गेले असता आरोपी सूरज हा पपिताकडे मुक्कामी होता. त्याने दुपारपर्यंत येथेच्छ मद्य प्राशन केले. सायंकाळी तो तेथेच झोपला. मध्यरात्री पपिताकडून सूरजच्या आईला शिवीगाळ केल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादात सूरजने पपितावर कैचीचे घाव घातले. गळ््यावर, डोक्यावर आणि पोटात कैचीचे घाव घातल्याने पपिताचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर सूरजने तेथील कपाटात असलेली ४० हजाराची रोख रक्कम घेऊन रात्री २ वाजताच्या सुमारास तेथून पळ काढला. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास घरफोडी अथवा आर्थिक व्यवहार या दिशेने होता. मात्र सूरजची पपिताकडे असलेली उठबस पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर सूरजचा शोध घेण्यात आला. सूरज हा नाशिक येथे गेल्याचे समजले. तांत्रिक मदतीने सूरजचे लोकेशन निश्चित करून त्याला अटक करण्याची कारवाई टोळीविरोधी पथकाने केली. त्याला कारंजा येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास वडगाव रोड ठाण्याच्या शोधपथकाकडे सोपविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक सुगत पुंडगे यांनी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली घेतली. तसेच त्याने वापरलेले शस्त्रही जप्त केले. सूरज हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर इतरही गुन्हे आहेत. सक्रिय गुन्हेगारांमध्ये त्याचा वावर असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. या गुन्ह्यात सामाजिक समस्येचा आणखी एक पैलू पुढे आला आहे. स्वैराचार स्वत:साठी कसा घातक ठरतो याचे हे जिवंत उदाहरण आहे.
वाट चुकलेल्या विवाहितेला प्रियकरानेच केले जीवनातून बाद
By admin | Published: July 02, 2017 1:33 AM