जिल्हा बँक : राज्य बँकेकडून कर्जाची तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना द्यावयाच्यांच्या दहा हजारांच्या कर्ज मदतीकरिता १३५ कोटी रुपये मंजूर झाले. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांना या माफीचा लाभ दिला जाणार आहे. परंतु प्रत्यक्षात माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडायला आणखी बराच अवधी आहे. म्हणून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करता यावे म्हणून तातडीने दहा हजार रुपये कर्जस्वरूपात मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात या मदत वाटपासाठी सहकारी बँकांकडे पैसाच उपलब्ध नव्हता. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्र ठरणाऱ्या सुमारे ३२ हजार शेतकऱ्यांकरिता १३५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार शासनाने या १३५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सहकारी बँकेकडून कर्जस्वरूपात जिल्हा बँकेला उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी सहकार मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती बँकेला दिली. केवळ ३२ हजार शेतकऱ्यांना लाभ दहा हजारांच्या मदतीचा जिल्ह्यातील केवळ ३२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. कारण हे शेतकरी १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या काळातील थकबाकीदार आहेत. शासनाने या काळातील थकबाकीदारांनाच ही तातडीची मदत देण्याचे आदेश दिले आहे. वास्तविक २०१२ पूर्वीच्या थकबाकीदारांच्या संख्या ८० हजारांपेक्षा अधिक आहे.
दहा हजारांच्या मदतीसाठी अखेर १३५ कोटी आले
By admin | Published: July 14, 2017 1:42 AM