फेरमूल्यांकनातून न्याय : उर्दू आणि सामान्य विज्ञानाच्या पेपरमध्ये कमी गुणदान पुसद : दहावीच्या परीक्षेत येथील सख्ख्या जुळ्या बहिणींनी भरघोस यश मिळवून तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. मात्र, नंतर या विद्यार्थिनींना कमी गुण असल्याची आवई उठविली गेली. त्यावर विद्यार्थिनींनी बोर्डाकडून फेरमूल्यांकन करून घेतले. त्यात आधीच्या गुणांपेक्षाही अधिक वाढ त्यांच्या गुणांमध्ये झाली. अखेर त्या जुळ्या बहिणीच तालुक्यात अव्वल ठरल्या आहेत. नायरा नायाब खान मुर्तूजा खान आणि नाजीश नायाब खान मुर्तूजा खान अशी या बहिणींची नावे आहेत. त्या पुसद येथील हजरत उमर फारुख हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. ६ जून रोजी आॅनलाईन जाहीर झालेल्या दहावी निकालामध्ये नायरा नायाब खान मुर्तूजा खान हिला ९५ टक्के व नाजीश नायाब खान मुर्तूजा खान हिला ९२ टक्के मिळाले. त्याच वेळी या मुलींनी व त्यांचे पिता मुर्तूजा खान अयुब खान यांनी कमी गुणदान मिळाल्याचे बोलून दाखविले होते. शेवटी मुर्तूजा खान अयुब खान यांनी अमरावती बोर्डाकडे फेरमूल्यांकनाची मागणी केली. त्यानंतर दोन्ही मुलींना न्याय मिळाला. फेरमूल्यांकनानंतर नायरा नायाब खान मुर्तूजा खान हिला ९८ टक्के तर नाजीश नायाब खान मुर्तूजा खान हिला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. दोन्ही जुळ्या बहिणींच्या उर्दू व सामान्य विज्ञानाच्या पेपरमध्ये कोणत्याही चुका नसताना प्रथम तपासणीस शिक्षकाने प्रत्येक उत्तराला कमी गुणदान करून मुख्य तपासणीसाचा ससेमिरा चुकविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन्ही मुलींना पूर्ण खात्री असल्याकारणाने त्यांचे वडील मुर्तूजा खान अयूब खान यांनी फेरमूल्यांकन करून घेतले. त्यानंतर सदर विषयामध्ये गुणांची वाढ होऊन ९५ टक्केचे ९८ टक्के व ९२ टक्केचे ९६ टक्के झाले. परीक्षा विभाग व मुख्य तपासणीसांनी न्याय दिल्याची भावना मुर्तूजा खान अयुब खान यांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)
शेवटी ‘त्या’ जुळ्या बहिणीच ठरल्या अव्वल
By admin | Published: July 30, 2016 1:00 AM