पुसद : माजी मुख्यमंत्रीद्वय दिवंगत वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी विभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत सुधाकरराव नाईक दूरदृष्टीचे नेते होते, असे विचार ॲड. आप्पाराव मैंद यांनी व्यक्त केले.
जलसंधारणाचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त खंडाळा येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अंगणवाडी व ग्रामीण भागातील कुपोषित बालकांना सकस आहार, औषधी व कपडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भारती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, तातू देशमुख, माजी आमदार विजय खडसे, सदबाराव मोहटे, दयाराम चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मानवंदना देण्यात आली. ॲड. आप्पाराव मैंद यांनी अद्याप या भागातील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न सुटला नाही याचा दोष नेत्यांना देण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी त्यांना सांगून प्रश्न सोडवायला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. सुधाकरराव यांच्यात व्हिजन होते. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. विरोधी लोकांचेसुद्धा ते काम करीत असल्यामुळे त्यांनी लोकांना फिरविण्याचे काम केले नाही. एक सांस्कृतिक वारसा लाभलेले त्यांचे नेतृत्व होते. ते मैत्रीचा धागा जपण्याचे काम करीत होते, असे ॲड. मैंद यांनी सांगितले. प्रास्ताविक बी.जी. राठोड, संचालन मनोहर चव्हाण, तर आभार साहेबराव धबाले यांनी मानले.
कार्यक्रमाला आर.एल. राठोड, सुभाष कांबळे, शीलानंद कांबळे, बाबूसिंग आडे, रमेश मस्के, भीमराव कांबळे, नामदेव मारकड, अवधूत मस्के, नामदेव गडदे, ठाणेदार गोपाल चावडीकर, रवींद्र महल्ले, संतोष मुराई, अनिल चेंडकाळे, डॉ. राहुल दुधे, डॉ. सचिन मस्के, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शरद तातेवार यांच्यासह ४० गाव माळपठार कृती समिती व गावकरी उपस्थित होते.