३५ लाख रुपये खर्च : पालिकेच्या निधीतून सौंदर्यीकरण यवतमाळ : स्थानिक बसस्थानक चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. आमदार मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण रखडले होते. आपण कार्यभार स्वीकारताच बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षातच हे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला. भीम साम्राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी यासाठी पाठपुरावा केला. प्रारंभी १५ लाख रुपये तरतूद असलेल्या या कामावर जवळपास ३५ लाख रुपये केवळ पालिकेच्या फंडातून खर्च करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष सुभाष राय यांनी यावेळी सांगितले. समाज व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या शहरातील बाबासाहेबांचे हे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील, असा आशावाद आमदार मदन येरावार यांनी व्यक्त केला. यावेळी संविधान अर्पण प्रसंगाचे चित्रशिल्प साकारणारे प्रवीण पिल्लारे, सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करणारे कंत्राटदार बी.बी. कांबळे आणि सदर काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भीम साम्राज्य संघटनेचे प्रतिनिधी हर्षवर्धन खोब्रागडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुदाम धुपे, संचालन राजेश धाये यांनी तर आभार उपअभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले. मंचावर नगरपरिषद नियोजन सभापती शैलेंद्रसिंह बैस, बांधकाम सभापती रेखा कोठेकर, आरोग्य सभापती मंदा डेरे, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती खोब्रागडे, शिक्षण सभापती साधना काळे, स्थायी समिती सदस्य प्रा. प्रवीण प्रजापती, नगरसेवक देविदास अराठे, अमन निर्बाण, पंकज मेश्राम, नगरसेविका डॉ. अस्मिता चव्हाण, नंदा जिरापुरे, प्रणिता खडसे, माजी नगरसेवक अॅड़ जयसिंह चव्हाण, नगरपरिषदेचे नियोजन विभाग प्रमुख महेश जोशी, डॉ. विजय अग्रवाल, प्रशासन अधिकारी डाफ, कार्यालय अधीक्षक मनोहर गुल्हाने, अभियंता सुप्रिया रिठे, पूजा जाधव, राजेश ढोले, गजानन वातिले उपस्थित होते. (वार्ताहर)
बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण
By admin | Published: May 22, 2016 2:17 AM