यवतमाळ : वयाच्या आठव्या वर्षापासून तमाशाचा फडात नाचू लागले. निसर्गाने दिलेला गोड आवाज आणि तमाशाच्या फडाच्या शाळेतच आलेलं पदलालित्य यामुळे मला शाळेची पायरी चढता आली नाही. लावणी हाच माझा अभ्यासक्र म तर फड हिच शाळा झाली. लावणीने मला भरभरून दिले. लावणी हाच माझा श्वास आहे. लावणीशिवाय मी दुसरा विचारच करू शकत नाही अशी भावना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केली.नेर येथील न्यू आझाद दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी आल्या असता त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. यावेळी सुरेखा पुणेकर यांनी आपला खडतर जीवनप्रवास उलगडला. लहानपणापासूनच मला लावणीचे वेड होते. परंपरेने तमाशाचा व्यवसाय चालून आला होता. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. दसऱ्यापासून घराबाहेर पडावे लागायचे. त्यामुळे शाळेचा आणि माझा अजिबात संबंध आला नाही. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी सुरूवातीला केवळ पोटाची भूक भागावी म्हणून भाकरीवर लावण्यांचे कार्यक्रम सादर केले. लावणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अलंकार आहे. त्याला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळावा असे स्वप्न मला पडायचे असे त्या म्हणाल्या.१९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योग व सिनेजगतातील अनेक नामवंत हजर होते. यावेळी मी दिलखेचक लावणी सादर केली.‘ तुम्हा बघूनी डावा डोळा’ या दिलखेचक अदाकारीने साऱ्या मुंबईला वेड लावले होते. त्या दिवसापासूूनच मला लावणीची नाट्यपूर्ण बांधणी व्हावी असे वाटत होते. अकलूज मराठा सेवा संघाने प्रथम कार्यक्रम घेतला. तेव्हापासून ही घोडदौड सुरू झाली. बैलगाडीतून गावोगाव सुरू झालेल्या भटकंतीला आशेची नवी पालवी फुटू लागली. बैलगाडी ते विमान आणि नारायणगांव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा माझा लावणीचा प्रवास अत्यंत खडतर असल्याचे सांगतांना नकळत त्यांचे डोळे पाणावले होते. लावणीकडे अश्लिल नजरेतून पाहिले जाते. रसिकांनी आपला हा दृष्टीकोन बदलविणे आवश्यक आहे. गरबा, भांगडा, कथ्थक या लोककलांचे जर ते राज्य संवर्धन करीत असेल तर लावणी या सभ्य प्रकाराचे संवर्धन का करू नये? असा सवालही सुरेखा पुणेकर यांनी यावेळी उपस्थित केला. पिकल्या पानाचा देठ कसा हिरवा, या रावजी बसा भावजी, कारभारी दमान या गाण्यांनी मला भरभरून दिलं आहे. आज जीवनांत जी काही समृध्दी आली आहे ती लावणीमुळेच. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मी लावणीसाठीच जगेन कारण लावणी नसती तर सुरेखा पुणेकर जगाला माहित झाली नसती, असे त्यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)
लावणीच माझा श्वास - सुरेखा पुणेकर : रसिकांनी दृष्टिकोन बदलणे आवश्यक
By admin | Published: January 17, 2015 12:17 AM