यवतमाळ : जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला. तो पुढे शाहू महाराजांनी चालविला आणि त्या लढ्याला बाबासाहेबांनी कायदेशीर स्वरूप दिले, असे मत अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. पांढरकवडा येथील जनपतकर गुरूजींच्या सत्कार सोहळ््याला आले असता ते यवतमाळातील विश्रामगृहात शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलत होते. अॅड़ आंबेडकर म्हणाले जातीने आम्हाला कधीही प्रतिष्ठा दिली नाही. जोपर्यंत इथल्या जाती नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश उभा राहू शकत नाही. आपल्याला आता नव्या टप्प्याची सुरूवात करावी लागेल. त्यासाठी येथील जात नष्ट होण्याची गरज आहे. या लढ्याला किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही. ज्या दिवशी भावनिक बाबासाहेबांबरोबर वैचारिक बाबासाहेब सांगायला प्रारंभ होईल, त्यादिवशी आंबेडकरी चळवळ विकसीत होईल. जातीबाबात बोलताना ते म्हणाले, जातीव्यवस्था आपल्या मनात एवढी भिनली आहे की, जे जातीचे नाहीत त्यांच्या बाबतीत आपण एकतर न्युट्रल राहतो, विराध करतो किंवा व्देष करतो. आज स्वातंत्र्य असले तरी देशबांधवात आपुलकीची भावना दिसत नाही. जातीय राजकीय नेतृत्व संपणार आहे. पार्टीच्या विरोधात भूमिका शेवटचा नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करता येईल. राजकीय व्यवस्थेत नव्या पिढीला नव्या सामाजिक आशयाचा अजेंडा मांडायला आम्ही तयार असून, त्यासाठी जात नसावी हे आमचे पहिले पाऊल असेल. कायद्याने स्त्री-पुरूष समान असूनही महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. संशोधन क्षेत्रात खास करून महिलांचा दबदबा आहे. तसेच अॅथलेटीक्स आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरिव योगदान राहिले आहे. अनेक कुटुंबांची ओळख त्या महिलेच्या कतृत्वामुळे आहे. त्यानंतरही पुरूषप्रधान संस्कृतीमुळे पाल्यांना बापाचीच जात लावली जाते. प्रेमविवाह करणाऱ्या मुलांसाठी जातीचा कॉलम वगळण्यात यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनांनीही या प्रश्नावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली तर चर्चा घडून येईल. विचारांची घुसळण होऊन दिशा ठरेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
जातविहीन समाज व्यवस्थेसाठी कायदा आवश्यक
By admin | Published: March 02, 2015 2:10 AM