ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : शहरात ले-आऊटचे पीक आले आहे. नदी, नाल्याकाठी मोठ्या प्रमाणात ले-आऊट उभारण्यात आले. त्यापैकी अनेक ले-आऊटची फ्लड झोनमध्ये नोंद नसतानादेखील ले-आऊटला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांची यात फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.
नियम व अटीनुसार ले-आऊट मंजूर करणे गरजेचे असते. मात्र, टाऊन प्लॅनर यांनी ‘बाजरा’ घेऊन टाऊन प्लॅन तयार करून दिले. यात तत्कालीन व विद्यमान उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप न केल्याने ले-आऊटधारकांचे फावले आहे. २०१२-१३ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नाल्याकाठावरील ले-आऊटमध्ये पाणी शिरले होते. तेथे वास्तव्यास असलेले नागरिक भयभीत झाले होते. त्यांना तेथून पळ काढावा लागला होता. ही विदारक परिस्थिती अनेकांनी अनुभवली आहे. परंतु संबंधित ले-आऊटधारकांनी या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारली नाही.
या संदर्भात ‘लोकमत’ने १६ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून सत्यता उजागर केली. त्यामुळे अनेक ग्राहकांनी नदी, नाल्याकाठावरील ले-आऊटमध्ये प्लॉट खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. प्लॉट खरेदी करताना अनेक ग्राहक या सर्व बाबी पाहत नाही. त्यांना या बाबी लक्षात येत नाही. त्यामुळे संबंधितांची लाखो रुपयांनी फसवणूक होत आहे. अशा ले-आऊटची सखोल चौकशी करून फ्लड झोनची नोंद नसलेले ले-आउट रद्द करावे, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
शहरात ४० ले-आऊटची उभारणी
शहरात जवळपास ४० पेक्षा जास्त ले-आऊट टाकण्यात आले आहे. त्यात नागरी सुविधांचा अभाव असताना नगरपंचायत प्रशासनाने अनेक ले-आऊट हस्तांतरित करून घेतले. यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीत त्यांचाही वाटा आहे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कोट
फ्लड झोनची नोंद नसेल तर संबंधित ले-आऊटधारकांना एसडीओंनी तांत्रिक मंजुरी कशी दिली. या सर्व बाबी एसडीओंच्या अखत्यारीत आहे. त्यात आमचा काही रोल नाही. नियम व अटीबाहेर असलेल्या ले-आऊट रद्दचे प्रस्ताव पाठवू
व्ही. हिंगासपुरे, टाऊन प्लॅनर, यवतमाळ
कोट :_
ले-आऊट ची नियमानुसरच उभारणी गरजेची आहे. टाऊन प्लॅनर ने ह्या सर्व बाबी पाहूनच प्लॅन बनवायला हवा. नाल्याकाठील ज्या ले-आऊटमध्ये पावसाळ्यामध्ये नाल्याचे पाणी शिरत असेल अशा ले-आऊटची चौकशी करून पुढील कार्यवाही करू.
स्वप्निल कापडणीस, उपविभागीय महसूल अधिकारी उमरखेड.