अखेर वादंग वाजलेच : पोलीस निरीक्षक वैद्यकीय रजेवरयवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेत पहिल्यांदाच दोन पोलीस निरीक्षक नियुक्त केले गेले आणि अपेक्षेनुसार चारच दिवसात त्यांच्यात अधिकारावरून वादंग वाजले. अखेर प्रमुख निरीक्षक वैद्यकीय रजेवर निघून गेले. स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) दोन पोलीस निरीक्षक दिले गेले. संजय गुज्जलवार हे प्रमुख तर त्यांच्या दिमतीला शिवाजी बचाटे यांना नेमले गेले. दोघेही आपली वर्णी लावून घेण्यात राजकीय मार्गाने यशस्वी झालेले. एकाने काँग्रेसची तर दुसऱ्याने राष्ट्रवादीची वाट निवडली. एलसीबीचे प्रमुख पद पटकाविण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले असले तरी प्रत्यक्ष अधिकार खेचून घेण्यात मात्र काँग्रेस वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आलेल्या पीआयला यवतमाळ किंवा अमरावती या दोनही ठिकाणी स्वत:साठी ‘सॉफ्ट कॉर्नर’ निर्माण करता आला नाही. त्यात काँग्रेसच्या कोट्यातील पीआय मात्र काहीसे यशस्वी ठरले. त्यांच्यावरही अमरावतीचे प्रशासन अद्याप मेहेरबान झालेले नाही. त्यासाठी त्यांनी प्रयत्न मात्र कायम ठेवले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादावर काँग्रेसच्या कोट्यातील पीआयने बहुतांश अधिकार आपणाकडे खेचण्यात यश मिळविले. अखेर याच मुद्यावर राष्ट्रवादीच्या कोट्यातील पीआयचे प्रशासनाशी ‘वाजले’. त्यानंतर हे पीआय ‘आजारी’ रजेवर निघून गेले. ते मुंबईत तळ ठोकणार असल्याची चर्चा आहे. ‘सेकंड’मधील नियुक्तीनंतरही सर्व काही मनासारखे घडल्याने काँग्रेसच्या कोट्यातील पीआय जाम खूश आहेत. आजारी रजेवरील पीआयचे परस्परच इतरत्र कुठे तरी पुनर्वसन व्हावे आणि एलसीबीच्या ‘वाट्या’तील अडसर दूर व्हावा ही सुप्त इच्छा ते बाळगून आहेत. त्यासाठी काँग्रेसमधील पोलिसांच्या गॉडफादरला पुन्हा कामालाही लावले गेले आहे. इकडे आजारी रजेवरील पीआयने १८ जुलै ही ‘डेडलाईन’ ठेवली आहे. १८ ला वरिष्ठांच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यात काही ‘चेंज’ झाल्यास ते पीआय पुन्हा ‘तंदुरुस्त’ होऊन एलसीबीत परतणार आहेत. चेंज न झाल्यास ‘आजारी’ रजा विधानसभेतील बदल्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या मोठ्या ‘चेंज’साठी राष्ट्रवादीचे अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. तर चेंज होऊ नये, किमान विधानसभा निघावी म्हणून काँग्रेसची नेते मंडळी मुंबईच्या टिळक भवनातून सूत्रे हलवित असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘एलसीबी’त अधिकारावरून रस्सीखेच
By admin | Published: July 15, 2014 12:13 AM