लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.सप्टेंबर २०१८ दरम्यान मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. भाजपाला सत्तेतून खाली खेचून तेथे काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मध्यप्रदेशात पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभरातून अनेक नेत्यांना बोलविले गेले होते. विदर्भातूनही काही नेते प्रचाराला गेले. यातील एका नेत्याने मध्यप्रदेशात आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याचे सांगून १६ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीला प्रचारासाठी दोन कोटी पाच लाखांचे अंदाजपत्रक आपल्या स्वाक्षरीनिशी जारी केले. त्यात २० सप्टेंबर ते २० आॅक्टोबरपर्यंत जनजागरण यात्रा, कार्यकर्त्यांचा खर्च, वाहने, इंधन, आहार, महिला आघाडी बनवून प्रचार करणे, घराघरापर्यंत प्रचार साहित्य पोहोचविणे, ५० मोठ्या सभा आदींचा समावेश होता.या नेत्याने स्वत:चे व आपल्या ‘राष्ट्रीय’ स्तरावरील नेतृत्वाचे केलेले ‘प्रेझेन्टेशन’ पाहून मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीही ‘इम्प्रेस’झाली आणि त्यांनी दोन कोटी पाच लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्याची तयारीही चालविली होती. नेमका त्याच वेळी विदर्भातील या काँग्रेस नेत्याच्या समाजाचा मध्यप्रदेशातील एक पदाधिकारी प्रदेश कार्यालयात पोहोचला. त्याला दोन कोटींच्या या बजेटची कुणकुण लागली. तेव्हा त्याने प्रदेशपुढे विदर्भातील या नेत्याची पोलखोल केली. या नेत्याकडे मध्यप्रदेशात तर सोडा त्यांच्या भागातसुद्धा कार्यकर्ते नाहीत, याची जाणीव करून दिली. त्यामुळे प्रदेश काँग्रेसला धक्काच बसला. वास्तव उघड झाल्यानंतरही या नेत्याने मध्यप्रदेश काँग्रेसकडून २० लाख रुपये खेचून घेण्यात यश मिळविलेच, हे विशेष. काँग्रेस नेत्याच्या या अंदाजपत्रकाची सर्वत्र चर्चा असून संकटाच्यावेळी पक्षाला व उमेदवारांना कोंडीत पकडणाऱ्या या नेत्याविरुद्ध रोषही व्यक्त केला जात आहे.‘मत विकण्याचा’ अनुभवविदर्भातील या काँग्रेस नेत्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला प्रचारासाठी ५० लाखांच्या रकमेची मागणी केली होती. दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या या नेत्याला ‘मत विकण्याचा’ अनुभव असून संपूर्ण देशच एकेकाळी त्याचा साक्षीदार बनला होता, हे विशेष.
विदर्भातील नेत्याचे मध्यप्रदेश काँग्रेसला दोन कोटींचे बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:23 PM
मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक प्रचारसमाज बांधवानेच फोडले बिंगअखेर २० लाखांत तडजोड