लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काही पोलिसांकडून विनाकारण मारहाण होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘लाठी सोडा आणि लाऊड स्पीकरचा माईक हाती घ्या’ अशा सूचना दिल्या आहेत.कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तमाम पोलीस रस्त्यावर उतरले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी ‘घरातच रहा’ असे आवाहन करूनही काही नागरिक कारण नसताना रस्त्यावर फिरताना आढळून येतात. वारंवार सांगूनही ते समजत नसल्याने मग पोलिसांना काठी हाती घ्यावी लागते. जिल्हाभरातील पोलीस लॉकडाऊनसाठी प्रचंड परिश्रम घेत आहे. वेळप्रसंगी त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचे समाजातील बहुतांश घटकांकडून स्वागतही होत आहे. मात्र काही चार-दोन पोलीस काठीच्या वापराचा अतिरेक करून पोलिसांच्या परिश्रमाला गालबोट लावत आहेत.त्यामुळेच पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आता सोशल पोलिसिंगवर (कम्युनिटी पोलिसिंग) भर देण्याचे आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी एसपींनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांशी संवाद साधला. तूर्त काठी बाजूला ठेवा, माईक हाती घेऊन लाऊड स्पीकरवरून जनतेशी सभ्य भाषेत संवाद साधा, नागरिक आधीच घाबरलेले आहेत, त्यांच्या चिंतेत आणखी वाढ करू नका, त्यांना घरातच राहण्याबाबत विनंती, आवाहन करा अशा सूचना एसपींनी दिल्या आहेत.यवतमाळचे पोलीस नागरिकांच्या घरापर्यंतयवतमाळ पोलिसांनी ‘एसपीजीई टीईए’ अॅप तयार केले आहे. ते डाऊनलोड करावे किंवा व्हॉटस्अॅप क्रमांक ९३५६७५८७७६ वर संपर्क करून लागणाºया साहित्याची माहिती द्यावी, हे साहित्य पोलीस कोणतेही शुल्क न आकारता नागरिकांच्या घरी पोहोचवतील. यामागे नागरिकांनी घरातच रहावे, पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत, हाच प्रामाणिक उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.कळंबच्या बालक मृत्युप्रकरणी वाहन चालकाचे घुमजावकळंबच्या माथा वस्ती येथील रहिवासी रोहित अनिल सोळुंके या दोन वर्षाच्या बालकाचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता यवतमाळला रुग्णालयात आणत असताना वाटेत पोलिसांनी संचारबंदीमुळे जागोजागी अडविल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्या संबंधीचा व्हीडीओ वाहन चालक जीवन जऊळकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जीवनला पाचारण करून त्याची चौकशी केली असता त्याने घुमजाव केले. मार्गात वाहनाची तपासणीच झाली नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. एवढेच नव्हे तर त्याच्या या माहितीच्या पुष्ठ्यर्थ पोलिसांनी कळंब ते यवतमाळ मार्गातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यातही सदर वाहन आजाराचे कारण सांगितल्याने पोलिसांनी कुठेच फार थांबविले नाही, लगेच सोडल्याचे आढळून आले. वास्तविक चालकाच्या व्हीडीओने पोलीस दलाची बदनामी झाली आहे. परंतु मानवीय दृष्टीकोणातून या चालकाला केवळ समज देऊन सोडण्यात आले असून त्याच्यावर गुन्हे दाखल केले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पोलिसांनो, लाठी सोडा, माईक धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM
कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तमाम पोलीस रस्त्यावर उतरले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी ‘घरातच रहा’ असे आवाहन करूनही काही नागरिक कारण नसताना रस्त्यावर फिरताना आढळून येतात. वारंवार सांगूनही ते समजत नसल्याने मग पोलिसांना काठी हाती घ्यावी लागते. जिल्हाभरातील पोलीस लॉकडाऊनसाठी प्रचंड परिश्रम घेत आहे. वेळप्रसंगी त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचे समाजातील बहुतांश घटकांकडून स्वागतही होत आहे.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेश । सोशल पोलिसिंगवर भर देण्याच्या सूचना