वणी : वणी नॉर्थ व साऊथ वेकोलिच्या कोळसा खाणींमध्ये कामगार नेते आपली व आपल्या युनियनची पकड वाढविण्याकरिता मैदानात उतरले आहे.वेकोलिचे काही कामगार नेते कामगारांच्या मागे फिरून आपली युनियन पावती फाडण्यात व्यस्त आहे. त्यासाठी वेकोलि परिसरामध्ये नेते कामागारांच्या मागे फिरताना दिसत आहे. वणी परिसरामध्ये अनेक कोळसा खाणी आहे. या खाणींमध्ये प्रमुख पाच युनियन कार्यरत आहे. या कोळसा खाणींमध्ये अनेक कामगार शिक्षित नसल्याने कामगारांना आपल्या युनियनकडे ओढण्याची चढाओढ नेत्यांमध्ये सतत सुरू असते. मात्र कामगारांनी कोणत्या युनियनचे सदस्य बनावे, हा त्यांचा अधिकार असतो. मात्र आपसी संबंध, सर्व कामगारांसोबत येत असल्याने कामगारांची कुचंबना होते. अनेक कामगार वैयक्तीक हिसंबंधापायी कामगार नेत्यांना नाराज करण्यास तयार नसतात. परिणामी अनेक कामगार दोन, तीन, चार, तथा पाचही युनियनची सदस्य पावती फाडतात. तथापि नियमाप्रमाणे एक कामगार केवळ युनियनचा सदस्य बनू शकतो. वेकोलि प्रशासनातर्फे कामगारांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगार नेते कामगारांना आपल्या युनियनकडे वळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. प्रत्येक कामगार नेता आपली युनियन सशक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यातून कामगार नेत्यांमध्येच मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक नेता सध्या प्रत्येक कामगार आपलाच माणूस असल्याचे ठासून सांगत आहे. त्यामुळे कामगार आणि नेत्यांमध्ये आपसी हेवेदाव्याचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढले आहे. या स्पर्धेवर आळा बसविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा यातून विपरित घडण्याची शक्यता बळावली आहे. त्याचा प्रत्यय नुकताच कुंभारखणी येथे आला आहे. (प्रतिनिधी)
वेकोलितील कामगार नेते मैदानात
By admin | Published: February 25, 2015 2:21 AM