समन्वय सभा : मारेगावात पाणी टंचाई व विकास कामांचा आढावा मारेगाव : तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाईने जनता होरपळून निघत असताना कर्मचारी थातुर-मातूर उत्तरे देत असल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आक्रमक झाले आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी टंचाईग्रस्त गावात तत्काळ पाणी पोहोचविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे समन्वय सभा चांगलीच वादळी ठरली. शनिवारी पार पडलेल्या या सभेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पंचायत समिती सभापती शीतल पोटे, उपसभापती संजय आवारी, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, उपविभागीय अधिकारी शिवांनद मिश्रा, तहसीलदार विजय साळवे, गटविकास अधिकारी टी.व्ही.बोरकर उपस्थित होते. यावेळी सरपंच व ग्रामस्थांनी अनेक गावात असलेल्या भीषण पाणी टंचाईची व्यथा मांडली. परंतु प्रशासन पाणी टंचाईवर उपाययोजना करीत नसल्याने संबंधित कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देतात, असे सांगितले. यावर आमदारांनी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी त्यांना बनवाबनवीचे उत्तर दिले. त्यांच्या उत्तरात शंका निर्माण झाल्याने आमदारांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. परिणामी कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. यावेळी उपस्थितांनी नगरपंचायतीच्या समस्या, महावितरण, घरकुल, अन्न पुरवठा, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पंचायत राज आदी विषयाच्या समस्या मांडल्या. ज्या गावात पाणी टंचाई आहे, अशा गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशा सूचना यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सभेला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) सभेचा प्रोटोकॉल चुकला समन्वय सभेत पदाधिकाऱ्यांच्या प्रोटोकॉलबद्दल उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू होती. आमदाराच्या बाजूला सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य व त्यानंतर अधिकारी बसायला हवे होते. पण सभेत सभापती शीतल पोटे यांना शेवटी बसविण्यात आले होते, तर काही अधिकारी लोकप्रतिनिधींच्या अगोदरच आमदाराजवळ जावून बसले होते, तर लोकप्रतिनिधी त्यांच्या नंतर बसले होते. भविष्यातील सभेत पदानुसार मान देत पदाधिकाऱ्यांना बसवावे, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त केली जात होती.
आमदारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
By admin | Published: April 23, 2017 2:36 AM