दिग्रस : रानातून मिळणारा रानमेवा ही निसर्गाची देण आहे. मात्र आज रानमेवा चवीपुरताच राहिला आहे. धकाधकीच्या जीवनात निसर्गातून मिळणाऱ्या अस्सल रानमेव्याकडे सर्वसामान्य नागरिकांनी पाठ फिरविल्याचा दिसून येत आहे. मात्र, दिग्रस तालुक्यात आदिवासी कोलाम समाजबांधवांसाठी रानमेवा मिळकतीचे साधन आहे. डिंक, चारोळी, गोलंबी विकून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करीत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली की, रानमेवा रानांत फुलून येतो. चारोळी डिंक, टेंभुरणे, बिबे, मोहफुल खाण्यासाठी उपयोगी पडतात, परंतु आता रानमेव्याची चव जंगलाशेजारी राहणाऱ्यापर्यंत मर्यादित राहिली आहे.
कड्याकपारीत दारिद्र्यात राहणारे व आदिवासी व कोलाम बांधव आजही सुगी संपली की, रानमेवा गोळा करण्यात मग्न होतात. डिंक, मोहफूल, गोलंबी गोळा करण्यासाठी दिवसभर जंगलात वणवण भटकतात. गोळा झालेला रानमेवा स्वतःही खातात आणि त्यावर उदरनिर्वाह करून स्वतःचा संसाराचा गाडाही हाकतात. चारोळी संकलन करणे किचकट काम आहे. जंगलातून काळीशार चारोळी आणून वाळवावी लागते. बिया फोडून चारोळी तयार केली जाते, तसेच डिंक गोळा करण्यासाठी सकाळपासून जंगलात भटकून डिंकाच्या एका खड्यासाठी झाडावर चढावे लागते. दिवसभर जंगलात भटकून जेमतेम अर्धा तर कधी एक किलो डिंक गोळा जमा होते. कधी तर पावभर डिंकावर समाधान मानावे लागते. ओल्या डिंकाचे वजन जास्त असल्यास लवकरच विकावा लागतो. खरेदीदारांकडून डिंकाला जवळपास १५० प्रतिकिलो भाव मिळतो.
धावंडा, खैरे, येन, बाभूळ, आजन या झाडापासून डिंक गोळा केला जातो. धावंड्याच्या डिंकाला विशेष मागणी आहे. डिंकात भेसळ करता येत नाही. डिंक तूप तेलात तव्यावर भाजून साखर टाकून खाण्याची मजा न्यारीच आहे. आयुर्वेदातही डिंकाला अतिशय महत्त्व आहे. औषधी चॉकलेट यात डिंकाचा वापर केला जातो.
आठवड्यात मिळणाऱ्या दोनशे-तीनशे रुपयांत ते संसाराचा गाडा चालवितात. वनातील उपयोगी वस्तूंचे संकलन करण्यासाठी क्षमता केवळ आदिवासींमध्येच आहे, परंतु त्यांच्या परिश्रमाचे योग्य मूल्य मिळत नाही. खरेदीदारांकडून व्यापाऱ्याकडून आदिवासी बांधवांची आर्थिक पिळवणूक केली जाते. शासन स्तरावरून ग्रामीण पातळीवर वनोपयोगी वस्तूच्या खरेदी-विक्रीचे फायदे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.