फुलसावंगी (यवतमाळ) : उमरखेड आणि महागाव तालुक्याच्या सीमेवरील येथून जवळच असलेल्या चिल्ली (ई) बिटअंतर्गत दगडथर ते निंगनूर रस्त्यालगत एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभागाची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
गुरुवारी सकाळी काही लोकांना दगडथर ते निंगनूर रस्त्यालगत दगडथरपासून काही अंतरावर एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. महागाव व उमरखेड वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून जागीच शवविच्छेदन करवून घेतले.
प्रथमदर्शनी बिबट्याचे डोके आणि मान एका झाडाच्या मुळीमध्ये अडकून पडल्याचे दिसत होते. त्यामुळे त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर तेथेच अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी उपविभागीय वनाधिकारी व्ही.के. करे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के. मुनेश्वर, वनक्षेत्र साहाय्यक अधिकारी एस.एस. चव्हाणकर, वनरक्षक डॉ. डी.एस. पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. येऊतीकर, पशू वैद्यकीय अधिकारी फोफसे, गायकवाड, धुळे, घुले, अंभोरे, धुमाळे, मोतेवाड, वन मजूर गणेश जाधव, गजानन राठोड, शिवाजी खराटे, दिगंबर मेंडके, गजानन फोपसे, संभाजी घावस, ज्ञानेश्वर डुकरे, संदीप वायकुळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
बंदी भागातील वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात
लगतच्या पैनगंगा नदीपात्रात बुधवारी एक नीलगाय मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी बिबट मृतावस्थेत आढळला. यामुळे वन विभागाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गस्त नावालाच उरली आहे. त्यांची निष्क्रियता बंदी भागातील वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतत आहे.
मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आहेत. त्यामुळे शिकारीची शक्यता दिसून येत नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत माहिती कळेल.
डी.के. मुनेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव.